प्रसारमाध्यम हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील गरज झाल्याने ती गरज पुरविणाऱ्या व्यवस्थेविषयी मत-मतांतरे होणारच.
ग्रंथाली वाचक दिनानिमित्त २५ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये आयोजित होणाऱ्या एका कार्यक्रमात "माध्यमरंग' या रविराज गंधेलिखित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होत आहे. दूरदर्शनमध्ये प्रदीर्घ सेवा केलेल्या रविराज गंधे यांचे या पुस्तकातील मनोगत...
आज सरकारी आणि खासगी मिळून जवळपास ७०० रेडिओ स्टेशन्स कार्यरत आहेत. एका सर्वेक्षणानुसार रेडिओवरील काही कार्यक्रमांची श्रोतृसंख्याही (लिसनर-शिप) टीव्ही कार्यक्रमांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी आकाशवाणीचीच निवड केली आहे.
प्रसारमाध्यम हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील एक गरज झाल्याने ती गरज पुरविणाऱ्या व्यवस्थेविषयी मत-मतांतरे होणे साहजिक आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमात काम करू इच्छिणाऱ्या माध्यमकर्मींमध्ये काम करण्याची सच्ची आस निर्माण व्हावी आणि माध्यमाकडे त्यांनी मिशन म्हणून पाहावे, अशी अपेक्षा आहे,
ब्रॉडकॉस्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC)ने गेल्या वर्षी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातल्या टीव्ही सेट्स असलेल्या घरांची संख्या १९.६७ कोटींच्या घरात आहे, तर जवळपास ८३.५८ कोटी लोक टीव्ही पाहतात. ग्रामीण भागात टीव्ही सेट्सची संख्या १० कोटींच्या आसपास आहे, तर शहरी भागात उर्वरित टीव्ही सेट्स आहेत. हे प्रमाण अनुक्रमे ग्रामीण भागात ५४% तर शहरी भागात ४६% एवढे आहे. भारतीय दूरचित्रवाणीचा व्यवसाय ६० हजार कोटींच्या घरात आहे. दरवर्षी यात १०% वाढ होणे अपेक्षित आहे, आजमितीला ८५० खासगी, तर २०० सरकारी वाहिन्या कार्यरत आहेत. यापैकी ४०० वृत्तवाहिन्या आहेत.
सध्या सिनेमा आणि टीव्ही उद्योगजगत एकमेकांना पूरक पद्धतीने काम करत आहेत. सिनेव्यवसायाला आपल्या सिनेमांच्या प्रसारासाठी टीव्हीची गरज लागते आणि टीआरपी मिळवण्यासाठी टीव्ही उद्योगाला सेलिब्रिटीजची नितांत गरज भासते. या दोन्ही माध्यमांत कलाकार, तंत्रज्ञांना भरपूर काम उपलब्ध आहे. आज जरी दूरचित्रवाणी व्यवसायाचे चित्र आकर्षक दिसत असले तरी भविष्यात ऑनलाइन करमणुकीच्या प्रचंड आक्रमणाला सिनेमा टीव्ही दोघांना तोंड द्यावे लागणार आहे. झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या वेब मालिका, यू ट्यूबवरील फिल्म-व्हिडिओज्, यूट्यूब चॅनल्स तरुणांना आणि आबालवृद्धांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहेत.
एका रात्रीत सामान्य माणसे आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून स्टार बनत आहेत. त्यांना लाखो हिट्स-लाइक्स मिळत आहेत. केवळ करमणूक नव्हे तर आरोग्य, गुंतवणूक, पाकक्रिया, समुपदेशन, शिक्षण, कौटुंबिक, व्यावसायिक खरेदी-विक्री अशा अनेकविध कारणांसाठी समाज माध्यमातील विविध अॅप्सचा पोर्टल्स, ग्राहकबांधणीसाठी वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. वास्तविक प्रिंट, इलेट्रॉनिक आणि न्यू मीडिया यांना स्वतःचे असे एक स्थान / वैशिष्ट्य आणि मर्यादादेखील आहेत. भारतातील सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत सर्व थरांतील लोक या माध्यमांचा आपापल्या आकलन-आवडीनुसार वापर करतात. आज इंटरनेट सेवेचा वापर करण्याची संख्या ४०% आसपास आहे. आर्थिक व्यवहार हे डिजिटली करण्याकडे कल आहे. टीव्हीयुगाची भारतात सुरुवात झाली, तेव्हा वृत्तपत्रे कालबाह्य होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात ती फोल ठरली. टीव्ही माध्यमाचा जसा प्रसार होऊ लागला, तसा राष्ट्रीय-प्रादेशिक वृत्तपत्रांचा व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर होऊन वृत्तपत्रे आणि त्यांच्या अनेकविध रंगीत पुरवण्यांच्या संख्येत वाढ झाली. वृत्तपत्रांनी आपल्या आशय-विषयात आमूलाग्र बदल केला. नामवंत वृत्तपत्रांच्या विविध शहरांतील स्थानिक आवृत्त्या प्रकाशित होऊ लागल्या. भारतातील शिक्षण-साक्षरतेचे वाढलेले प्रमाण, अत्यंत माफक-स्वस्त दरात सुलभ रीतीने उपलब्ध होणारे मुद्रित साहित्य-वृत्तपत्रे, आणि भारतीयांचा उंचावलेला आर्थिक स्तर यामुळे मुद्रित माध्यमांची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आजमितीस ६५९ प्रकाशन केंद्रे, ९१० नियतकालिके, ७७४ दैनिके, १२५ नियतकालिके भारतातून प्रकाशित होतात. ती अधिकाधिक आकर्षक आणि वाचनीय झाली. टीव्हीच्या प्रसाराने त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. जगभरात हेच चित्र दिसते.
रेडिओच्या बाबतीतही हाच अनुभव आल्याचे दिसते. आज सरकारी आणि खासगी मिळून जवळपास ७०० रेडिओ स्टेशन्स कार्यरत आहेत. एका सर्वेक्षणानुसार रेडिओवरील काही कार्यक्रमांची श्रोतृसंख्याही (लिसनर-शिप) टीव्ही कार्यक्रमांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनात आले आहे. भारतातील सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचता यावे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी आकाशवाणीचीच निवड केली आहे, हे असं का घडलं? कारण त्या त्या माध्यमांनी काळाची पावलं ओळखून आपल्या कार्यक्रमाच्या दर्जात, आशय-विषयात, निवडीत, सादरीकरणात कालानुरूप लोकाभिमुख लोकांना रुचतील, असे बदल केले म्हणून ते स्पर्धेत टिकून राहिले. त्यामुळे आज जरी न्यू मीडियाची लाट आलेली असली, तरी सर्व माध्यमे आपापल्या गुणविशेषांसह स्पर्धेत टिकून राहतील, अशी आशा आहे. कारण बाजारपेठेची मागणी म्हणून एकमेकांना पूरक व्यवसाय करण्याची निकड सर्व माध्यमांना आता लक्षात आली आहे.
या तीव्र स्पर्धेमुळे आणि माहितीच्या महास्फोटात टिकून राहण्यासाठी माध्यमेही बाजारशरण होत चालली आहेत हे सत्य नाकारता येणार नाही. जसे पर्यावरणसंवर्धन हे विकासाचा समतोल साधून करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमाचा दर्जा, प्रतिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीही व्यवसाय सांभाळूनदेखील करता येते. त्यासाठी प्रतिभा, कल्पकता आणि सामाजिक बांधिलकी माध्यमकर्मींनी अंगी बाणवणे आवश्यक आहे.

Post a Comment