0
औरंगाबाद- मराठवाड्यातील एकमेव असे सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिले आहेत. यापूर्वी हे प्राणिसंग्रहालय बंद करण्याची तंबी देणाऱ्या ६ नोटिसा देण्यात आल्या होत्या. तरीही प्राण्यांसाठी काहीही सुधारणा न केल्याने ते कायमचे बंद करण्याचे आदेश प्राधिकरणाने जारी केले. असे असले तरी प्रत्यक्षात हे प्राणिसंग्रहालय बंद होणार नाही. २०१६ मध्ये दिलेल्या नोटिशीच्या आधारे हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर बरीच कामे झाली असून केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाकडे दाद मागितली जाणार आहे.

या प्राण्यांना अन्यत्र हलवणे वाटते एवढे सोपे नाही. त्यामुळे हे संग्रहालय बंद होणार नाही किंवा येथील प्राणी अन्यत्र जाणार नाहीत. फक्त यापुढे प्राधिकरणाने घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन मनपाला करावे लागेल. १० वर्षांपासून प्राधिकरणाने वेळोवेळी मनपाला नोटिसा दिल्या आहेत. तेव्हाच प्राणिसंग्रहालय स्थलांतरित करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. आधी हे संग्रहालय दौलताबाद घाटातील जंगलात स्थलांतरित करण्याचे ठरले होते. परंतु वन विभागाने तेथे जागा देण्यास नकार दिल्याने मिटमिटा येथे २०० एकर जागेवर ते स्थलांतरित करण्याचे ठरले. जागेचा ताबा घेणे यात सहा वर्षे गेली. या काळात सध्याच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज होती. त्या होत नसल्याने प्राधिकरणाने मनपाला नोटिसा बजावल्या होत्या. २०१६ मध्ये निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर काम सुरू झाले. परंतु प्रशासनाने तसे प्राधिकरणाला कळवले नाही. त्यामुळे त्यांनी प्राणिसंग्रहालय बंद करण्याचे आदेश दिले.

प्राणिसंग्रहालयाला लागूनच असलेल्या उद्यानात मिनी ट्रेन चालत असे. या ट्रेनमुळे या प्राण्यांना त्रास होतो. त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय येतो, असे प्राधिकरणाचे म्हणणे होते. ही ट्रेन बंद केल्याची माहिती प्राधिकरणाला न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली. संग्रहालयाच्या आत प्राणिसंग्रहालय संचालकांचे कार्यालय आहे. येथील अधिकारी व कर्मचारी तेथे जाण्यासाठी वाहनांचा वापर करतात. हे कार्यालय तेथून बाहेर काढावे. असे निर्देश असूनही त्याचे पालन झालेले नाही. दरम्यान, प्राधिकरणाच्या निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याने निवृत्तीच्या एक दिवस आधी सूडबुद्धीने हा आदेश जारी केल्याचा संशय आहे. असो, यावर आम्ही केंद्राकडे अपील करण्याचा निर्णय घेतला आहे, असे महापौर घोडेले म्हणाले.

आदेशाला मिळू शकते स्थगिती

प्राधिकरणाने हे संग्रहालय बंद करण्याचे अंतिम आदेश दिले असले तरी लगेच ते बंद होणार नाही. याच्या विरोधात मनपा केंद्र सरकारकडे अपील करणार आहे. प्राधिकरणाच्या सूचनेनुसार केलेल्या कामांची माहिती दिली जाईल. त्यामुळे या आदेशाला स्थगिती मिळू शकते. दुसरे असे की, यातील काही प्राणी स्थलांतरित करताना मृत्यू पावण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्थलांतर सहजतेने होणार नाही. त्यामुळे येथेच आवश्यक ती कामे करावी लागतील. त्यानंतर जेव्हा मिटमिटा येथील सफारी पार्कचे काम पूर्ण होईल तेव्हा येथील प्राणी म्हणजेच हे संग्रहालय स्थलांतरित होईल.Order of authority to close the zoo in Siddhartha Garden in Aurangabad

Post a Comment

 
Top