0
डाळिंबाचे माहेरघर बनलेल्या आटपाडी तालुक्यातील निर्यातक्षम डाळिंबाची भुरळ युरोप खंडातील अनेक देशांना पडली आहे. कष्टातुन फुलविलेल्या लाल टपोऱया डाळिंबाने यापुर्वीच युरोपमध्ये आपला ठसा उमटविला आहे. आता युरोपच्या नेदरलॅण्ड देशातील निर्यातक्षेत्रात असलेल्या प्रतिनिधींनी आटपाडीतील डाळिंब बागांना भेटी देऊन पाहणी केली. येथील शेतकऱयांच्या कष्टाचे कौतुक करतानाच थेट निर्यातीसाठी शेतकऱयांशी बोलणी केली.
प्रतिकुल दुष्काळी स्थितीवर मात करत शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱया आटपाडी तालुक्यातील शेतकऱयांनी डाळिंबाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. देशातील कानाकोपऱयात आटपाडीच्या डाळिंबाने जागा निर्माण केल्यानंतर परदेशातही या डाळिंबाने प्रवेश मिळवून निर्यातीतून शेतकऱयांचे खिसे लाल करत देशालाही परकीय चलन मिळवून देण्याचे काम डाळिंबाने केले आहे.
मागील काही वर्षात आटपाडी तालुक्यातील शेतकऱयांनी रेसिडय़ू फ्री डाळिंब उत्पादनाला प्राधान्य देऊन युरोप खंडातील देशात मागणी असणाऱया डाळिंबाची निर्यात सुरू केली आहे. विविध व्यापाऱयांमार्फत हा माल परदेशात पाठविला जात आहे. त्याचा चांगला दरदेखील शेतकऱयांना मिळत आहे. आजपर्यंत स्थानिक व्यापाऱयांमार्फत युरोपमध्ये जाणाऱया डाळिंबाची भुरळ पडल्याने थेट नेदरलॅण्ड येथील दोन प्रतिनिधींनी मंगळवारी आटपाडीत येवुन शेतकऱयांच्या बागांना भेटी देऊन पाहणी केली.

Post a Comment

 
Top