0
मानापमान नाट्य मुख्यमंत्र्यांना डावलल्याने भाजप पदाधिकाऱ्यांचा अनुपस्थिती लावून निषेध

मुंबई- नरिमन पाॅइंट ते कांदिवली या मुंबई सागरी किनारा महामार्गाचे रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमास शिवसेनेने जाणीवपूर्वक निमंत्रण दिले नाही, या कारणास्तव मुंबई महापालिका व भाजपच्या स्थानिक आमदारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून सेनेचा मूकनिषेध केला.

वरळी येथे सागरी महामार्गाचे उद्धव यांनी सपत्नीक भूमिपूजन केले. या वेळी उद्धव म्हणाले, मुंबई गेली काही वर्षे धावताना अडखळत होती. या महामार्गामुळे आता २४ तास धावेल. सागरी महामार्ग टोलमुक्त असणार असून तो शिवसेना वेळेत पूर्ण करेल. प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेनेने केले असून उद्घाटनही शिवसेनाच करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उद्धव यांनी भाजपला चिमटे काढले. 'आज मला खूप बोलायचे होते. पण आनंदाच्या दिवशी अधिक न बोललेलं बरं. मुंबई महापालिकेची पारदर्शकता जगाने पाहिली आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला घराचा आहेरही दिला. मुंबईच्या पूर्व किनाऱ्याचा विकास केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे रखडल्याचा आरोप उद्धव यांनी या वेळी केला. शिवसेनेने निवडणूक वचननाम्यात ५०० चौ. फू. पर्यंतच्या मुंबईतील घरांना मालमत्ता करात माफीचा घेतलेला निर्णय सरकारने अडकवून ठेवल्याचे सांगत पालिकेच्या रिकाम्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजना राबवली जात असल्याबाबत उद्धव यांनी नापसंती व्यक्त केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबई पालिकेतील शिवसेनेची सत्ता ही भाजपच्या आशीर्वादावर आहे. राज्यात सत्तेत गडबड नको म्हणून भाजप पालिकेत सेनेकडून तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहे.

सरकारमधील दोन्ही पक्षांकडून हेवेदाव्यांचे सत्र
> मंगळवारी (दि. १८) पंतप्रधान मोदी कल्याण येथे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनास येत आहेत. त्या दौऱ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव यांना स्थान दिलेले नाही. सागरी किनारा महामार्गाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देऊन शिवसेनेने त्याचे उट्टे काढले.

> आगामी निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजपला युती हवी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले नसले तरी त्यावर टिप्पणी करू नका, अशा सूचना पक्षाकडून पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

> मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमात बोलावले नसल्याने पालिकेतील भाजपचे पदाधिकारी व स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेत नावे असून कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.

वादात मनसेचीही उडी, राज ठाकरे मच्छीमारांच्या भेटीला
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पावरून शिवसेना-भाजप यांच्यात जुंपलेली असतानाच अाता मनसेनेही त्यात उडी घेतली अाहे. या प्रकल्पाच्या वरळी भागातील बांधकामामुळे मासेमारी व्यवसाय संकटात अाल्यामुळे काेळी बांधवांनी तीव्र विराेध करीत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. राज ठाकरे यांनी वरळी काेळीवाड्यात जाऊन मच्छीमारांच्या व्यथा जाणून घेतल्या.

स्थानिकांच्या अडचणी लक्षात न घेता प्रकल्प रेटला तर संघर्ष अटळ अाहे, असा इशारा राज ठाकरे यांनी या वेळी दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या ड्रीम प्रोजेक्टबाबत मनसेनेही अाक्रमक भूमिका घेतली अाहे. सध्या या प्रकल्पासाठी भराव टाकण्याचे काम सुरू अाहे. या खडकाळ जागेत माशांचे प्रजनन हाेते. त्यातून मासे माेठ्या प्रमाणावर अंडी देतात. भराव टाकल्यामुळे या भागातील पर्यावरण नष्ट हाेऊन उपासमारीची वेळ येण्याची भीती असल्याचे कोळी बांधवांकडून व्यक्त केले जात आहे.

अाडमुठेपणा कायम ठेवला तर संघर्ष अटळ
एखादा प्रकल्प राबवताना स्थानिकांच्या अडचणी काय अाहेत हे जाणून घेणे गरजेचे अाहे. पण तसे न करता पालिका प्रशासन अाडमुठेपणा करीत असेल तर संघर्ष अटळ अाहे. या प्रकल्पातील तांत्रिक बाबींवर उपाययाेजना करण्यासाठी अापण पालिका अायुक्त अजाेय मेहता यांच्याशी चर्चा करू, असे अाश्वासन राज ठाकरेंनी या वेळी दिले.
BJP boycott the coastal

Post a comment

 
Top