0
आरटीओ कडुन भरमसाठ दंड आकारणी करण्यात येत असल्याच्या विरोधात सोमवारी शेअरींग रिक्षा चालकांनी एकदिवशीय संप केला. अचानकपणे हा संप केल्यामुळे शहरातील वाहतुक व्यवस्थेवर याचा परिणाम जाणवला. प्रवाशांना योग्य ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाच उपलब्ध नसल्याने तासनतास उभे रहावे लागले. आरटीओ ने ही कारवाई बंद न केल्यास उग्र आंदोलनाचा इशाराही या रिक्षा चालकांनी दिला आहे.
बेळगाव शहरात 500 हून अधिक शेअरिंग रिक्षा चालक आहेत. 3 अधिक 1 असा परवाना या रिक्षा चालकांना देण्यात आला आहे. यात त्यांनी बदल करून रिक्षाच्या मागील बाजुसही प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. याच्याच विरोधात आरटीओने मागील 15 दिवसात मोहिम उघडली असून, भरमसाठ दंड आकारला जात आहे. 4 ते 5 हजार इतका दंड एका वेळी आकारला जात असल्याने हा दंड भरायचा कोठून असा प्रश्न या रिक्षा चालकांसमोर आहे.
सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासुन ग्लोब थिएटर शेजारील खुल्या मैदानात रिक्षा लावून बंद पुकारण्यात आला. या संदर्भात माजी मंत्री व आमदार सतिश जारकीहोळी यांचीही भेट घेवुन त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. रिक्षा बंद असल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. ज्या ठिकाणी बस पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी रिक्षा जात असल्याने प्रवाशांना रिक्षावर अवलंबून रहावे लागत होते. यामुळे शाळकरी विद्यार्थी, रूग्ण वयस्कर नागरिकांचे  हाल झाले.
जाफर बागवान (रिक्षा चालक)
मागील 15 दिवसांपासुन आरटीओ कडून विनाकारण त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. या ना त्या कारणाने चार ते पाच हजार रूपये दंड आकारण्यात येत आहे. चूक असल्यास दंड आकारावा परंतु कारवाई करायची म्हणून दंड आकारूनये असे त्यांनी सांगितले.
जावेद ताशिलदार (रिक्षा चालक)
कोणतेही चुकीचे काम न करता रिक्षा चालक प्रामाणिकपणे आपले काम करित असतात. परंतु अशा प्रकारे त्रास देवून रिक्षावाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या संपामध्ये शहरातील 500 हून अधिक रिक्षा सहभागी झाल्या असून लवकर तोडगा न निघाल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे त्यांनी सांगितले.
हाफिज सौदागर (रिक्षा चालक)
पूर्वी तीन ते साडेतीन हजार रूपये इतका रिक्षाचे इन्शुरन्स होते. परंतु सध्या हे वाढून नऊ ते साडेनऊ हजार इतके झाले आहे. त्यामुळे भाडे मिळणार 100 ते 200 रूपयांचे त्यातून कर्ज कोठून फेडायचे आणि हा इन्शुरन्स कोठून भरायचा असा प्रश्न आमच्या समोर असल्याचे त्यांनी सांगितले.
अय्याज मुल्ला (रिक्षा चालक)
शहरात केवळ तीन एलपीजी गॅस स्टेशन आहेत त्यामुळे त्यांची संख्या वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करूनही अद्याप नवीन स्टेशन सुरू करण्यात आलेले नाही. शहराच्या दक्षिण भागात एखादे गॅस स्टेशन झाल्यास वडगाव, शहापूर, टिळकवाडी या भागातील रिक्षाचालकांना एलपीजी गॅस भरण्यासाठी शहराच्या उत्तर भागात यावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top