0
मंत्री जानकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई- धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचा लवकरच लाभ मिळणार असून लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजाला गुड न्यूज मिळेल, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

मंत्री जानकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर जानकर प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते. जानकर म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी अशीच शंका व्यक्त केली जात होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अखेर मार्गी लावला आहे. तसाच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही ते मार्गी लावतील. धनगर समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वत: मुख्यमंत्री करणार आहेत.

त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिष्टमंडळाला आश्वस्त केल्याचे जानकर यांनी सांगितले. टाटा समाज विज्ञान संस्थेने (मुंबई) धनगर समाजासंदर्भात दिलेल्या अहवालाचा शासन सध्या अभ्यास करत आहे. या अहवालाच्या आधारे धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस केली जाणार आहे. फडणवीस सरकार धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी करत असलेल्या प्रयत्नाविषयी समाजाच्या मनात जराही किंतू नाही, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
Good news for 'Dhangar community' says Mahadev Jankar

Post a comment

 
Top