मिशन २०१९ पूर्वांचल दौऱ्यात मोदींनी जातीय, विकासाच्या शस्त्रांनी साधले निवडणुकीचे गणित
- गाझीपूर / वाराणसी- काँग्रेसचा खोटेपणा व अप्रामाणिकतेपासून सतर्क राहा. चौकीदार प्रामाणिकपणे दिवस-रात्र कामात व्यग्र आहे. चौकीदारामुळे काही चोरांची रात्रीची झोप उडाली आहे. या चोरांना योग्य ठिकाणी नेले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. मोदी शनिवारी पूर्वांचलच्या दौऱ्यावर होते. गाझीपूरमध्ये त्यांनी संवाद साधला. शनिवारी त्यांनी वाराणसीलादेखील भेट दिली होती.मतांचे राजकारण केल्याचा परिणाम काय हाेतो, हे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये लाखो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. तेथे काँग्रेसने मागील दरवाजाने येऊन सरकार स्थापन केले. शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफीचा लॉलीपॉप हाती दिला. शेतकऱ्यांना आश्वासन तर दिले, पण केवळ ८०० चे कर्ज माफ केले. त्यामुळे तुम्ही अशा लॉलीपॉप कंपन्यांवर (काँग्रेस) विश्वास कसा काय ठेवू शकता ? २००९-१० मध्ये काँग्रेसने कधीही कर्ज माफ केले नाही. तेव्हा काँग्रेसने शेतकऱ्यांना एकूण ६ लाख कोटींच्या कर्जापैकी केवळ ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. कॅगचा अहवाल आला तेव्हा या रकमेपासून ३५ लाख शेतकरी वंचित राहिल्याचे स्पष्ट झाले. मग पैसे कोठे गेले, असा प्रश्न मोदींनी केला.महाराजा सुहेलदेव यांच्या जातीचे राजकारण
उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये ११ व्या शतकातील महाराजा सुहेलदेव यांच्या जातीवरून राजकारण रंगू लागले आहे. मंत्री आेमप्रकाश राजभर यांचा पक्ष त्यांना राजभर म्हणून संबोधतो. मात्र डाक तिकिटावर राजभर वगळले आहे. त्यास त्यांनी आक्षेप घेतला. नाराजीही व्यक्त केली. खासदार सावित्रीबाई फुले यांनी महाराजा सुहेलदेव हे पासी समुदायाचे असल्याचा दावा करून त्याचा उल्लेख करण्यासाठी धरणेही दिले.मोदींच्या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्यमंत्री व अपना दलच्या अनुप्रिया पटेल तसेच राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आेमप्रकाश राजभर उपस्थित राहिले नाहीत. महाराजा सुहेलदेव यांच्या नावाशी छेडछाड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. महाराजा सुहेलदेव यांचे नाव अपूर्ण आहे. जाणूनबुजून त्यांच्या नावातील राजभर हा शब्द हटवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. भाजपने अपना दलकडे दुर्लक्ष करणे सुरू केल्याचा आरोप अनुप्रिया यांनी केला. त्यामुळे आघाडीतील फूट स्पष्टपणे दिसून आली आहे.सोळाव्यांदा वाराणसी दौरा
पंतप्रधानांनी आपला मतदारसंघ वाराणसीला सुमारे २८० कोटी रुपयांच्या २९ योजनांची भेट दिली. साडेचार वर्षादरम्यान मोदींनी आपल्या मतदारसंघाला भेट देण्याची ही सोळावी वेळ होती.१७ मेडिकल कॉलेज : योगी
-गाझीपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, सत्तर वर्षांत केवळ १३ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली. मात्र साडेचार वर्षांत १७ वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात यश मिळाले.
-आमच्या इतिहासाशी छेडछाड केली जात आहे. आम्हाला अपमानित केले. धर्माच्या नावावर आमच्या लोकांना मूर्ख बनवले जात आहे. व्होट बँकेचे राजकारण केले जात आहे. व्होट बँकेसाठी आमचा वापर होत आहे. -आेमप्रकाश राजभर, मंत्री उत्तर प्रदेश. अध्यक्ष सुहेलदेव भारतीय समाज पार्टी.
Post a Comment