सातत्याने छेड काढत असल्यामुळे महिलेने रागाच्या भरात दोन मित्रांच्या मदतीने युवकाचा कापले होते लिंग.
मुंबई- सातत्याने छेड काढत असल्यामुळे महिलेने रागाच्या भरात दोन मित्रांच्या मदतीने लिंग कापलेल्या युवकाचा ३ दिवसांनंतर जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. २६ डिसेंबर रोजी मुंबईतील डोंबिवलीमध्ये हा प्रकार घडला होता. दरम्यान, तिघेही जण सध्या अटकेत आहेत.
तुषार पुंजरे असे मृताचे नाव असून तो गृहकर्जविषयक सल्लागार होता. तो सातत्याने छेड काढत असल्याचा एका ४२ वर्षीय महिलेचा आरोप आहे. यामुळे महिला खूपच त्रासली होती. तुषारला धडा शिकवण्यासाठी तिने त्याला रेल्वेरुळाशेजारील एका निर्जन स्थळी बोलावले. दरम्यान, तिने आधीच प्रतीक केनिया आणि तेजस म्हात्रे या दोन मित्रांसोबत कट रचलेला होता. त्यानुसार प्रतीक आणि तेजस दोघेही घटनास्थळी दबा धरून बसलेले होते. तुषार त्या ठिकाणी येताच दोघांनी त्याला पकडून झाडाला बांधले आणि बेदम मारहाण केली. रागाच्या भरात तुषारचे लिंगही चाकूने कापून टाकले. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती स्थानिकांकडून मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तुषारला डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल केले. परंतु तुषारची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. रविवारी तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment