0
मुंबई - 'शिवसेनेशी युती करण्यास पक्ष उत्सुक अाहेच. मात्र याउपरही शिवसेना नेते स्वबळाच्या भूमिकेवर ठाम राहिले किंवा जागावाटपाच्या चर्चेत भाजपला दुय्यम स्थान देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर अापणही अागामी निवडणुका स्वबळावर लढण्यास सक्षम अाहाेत,' असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रात्री खासदार, अामदारांच्या बैठकीत दिला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी मुंबईत येऊन पक्षाच्या काेअर कमिटीतील नेत्यांची बैठक घेतली हाेती. रात्री उशिरापर्यंत त्यात खल चालला. या वेळी शहा यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी व दुष्काळी मदत या कळीच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका जाणून घेतली. तसेच अागामी निवडणुकांत शिवसेनेसाेबत अापल्याला युती करायची असल्याने त्यांच्यासाेबत यापुढे वाद टाळावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांना दिल्या हाेत्या. मात्र हे सांगतानाच स्वबळावर लढण्याची वेळ अाल्यास पक्षाची तयारी काय असेल याचा अाढावाही शहा यांनी घेतला हाेता. यातून मुख्यमंत्र्यांनी याेग्य ताे 'संदेश' घेत ताे पुढे नेत्यांपर्यंत पाेहाेचवला.

बुधवारी रात्री त्यांनी पक्षाच्या अामदार, खासदारांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेला सोबत घेण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु जागा वाटपावरून युती फिस्कटली तर आपणही स्वबळावर निवडणूक लढवून पुन्हा सत्तेवर येऊ शकताे. ३ राज्यात काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका, जोमाने कामाला लागा,' असा सल्ला देत मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांचे मनाेबल वाढविण्याचा प्रयत्न केला. तसेच शहा यांनी दिलेल्या सूचनाही त्यांच्यापर्यंत पाेहाेचवल्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानात सत्ता गेल्यानंतर आता भाजपने लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्राकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचे ठरवले आहे. यासाठी अमित शहांनी मंगळवारी मुंबईचा दाैरा केला. राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पाेहाेचवण्यासाठी अाराखडा तयार करा, अशा सूचना शहा यांनी मुख्यमंत्र्यांना त्यावेळी दिल्या. आगामी लोकसभा निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात लढवली जाईल आणि पुन्हा भाजपच सत्तेवर येईल. शिवसेनेशी आमची युती होईलच, असे अमित शहा यांनी एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले हाेते. भाजपचे सध्या १६ राज्यांत सरकार असून मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील पराभवाचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. सर्वाधिक राज्यांत आमचीच सत्ता असल्याने आमच्याशिवाय सत्तेवर कोण येईल, असा उलटप्रश्नही त्यांनी केला.

शिवसेनेकडून भाजपला झुकवण्याचे प्रयत्न
२००९ पर्यंत राज्यात शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा लढवत आली होती. मात्र २०१४ मध्ये लोकसभेसाठी युती केल्यानंतर विधानसभेसाठी शिवसेनेने १५१, भाजप ११९ व मित्रपक्ष १८ असा फॉर्म्युला भाजपपुढे ठेवला होता. परंतु तो भाजपला अमान्य झाला. त्यानंतर मित्रपक्षांना सोडलेल्या १८ जागांपैकी ११ जागा भाजपला, तर ७ जागा मित्रपक्षांना असा शिवसेना १५१, भाजप १३० आणि मित्रपक्ष ७ असा फॉम्युर्ला शिवसेनेने दिला. मात्र मित्रपक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. तेव्हा भाजपनेही युती ताेडली. मात्र भाजप स्वबळावर १२२ जागा मिळवून सर्वात माेठा पक्ष ठरला. तर मोदी लाटेतही शिवसेनेने ६३ आमदार निवडून आणले होते. २०१९च्या निवडणुकीसाठी भाजप आता युतीचे सूतोवाच करू लागली असली तरी शिवसेना आता भाजपपुढे न झुकता भाजपलाच झुकवण्याकडे लक्ष देणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेचा युती करण्याचा विचार नाहीच : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, 'शिवसेनेने भाजपकडे १५५ जागा मागितल्याच्या बातम्यांत काहीही तथ्य नाही. आम्ही युतीबाबत विचारही केलेला नसून कोणाशी कसल्याही प्रकारची चर्चाही केलेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीचा प्रश्नच उद््भवत नाही.'BJP President Amit shah in mumbai Core Committee Meeting, Shiv Sena and Bjp Election Plans

Post a Comment

 
Top