0
संयम राखा राजनाथ सिंह यांचे खासदारांना आवाहन, यूपीच्या खासदारांची विचारणा.

नवी दिल्ली- अयोध्येमध्ये राममंदिरासाठी कायदा करण्याच्या मागणीवर हिंदुत्ववादी संघटनांनी निर्माण केलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावर खासदारांना संयम राखण्याचा सल्ला दिला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे खासदार रवींद्र कुशवाह व हरिनारायण राजभर यांनी संसदीय पक्षाच्या बैठकीत राममंदिराच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय,अशी विचारणा केली. त्यांचे समर्थन करत काही अन्य खासदारांनीही लोकांचा दबाव वाढत असल्याने मंदिर बांधकामाबाबत सरकार काय करत आहे, असा मुद्दा उपस्थित केला. बैठकीत राजनाथ सिंह यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. मात्र,राममंदिर निश्चित बांधले जावे व ते अवश्य होईल, खासदारांनी संयम पाळावा, असे सांगितले. यानंतर त्यांनी भाषण समाप्त केले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा बैठकीत उपस्थित नव्हते.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदू संघटनांनी राममंदिराचे लवकरात लवकर बांधकाम करण्याची मागणी केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक नेत्यांनी यासाठी अध्यादेश आणण्याची मागणी केली आहे. भाजप या संघटनांच्या भावनांशी सहमत आहे. मात्र, कायदा तयार करण्याचे समर्थन केलेले नाही. अयोध्येतील जमिनीच्या वादावर सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंदिर बांधकामाचा मार्ग मोकळा झाल्यास लोकसभा निवडणुकीत विजयाची शक्यता बळकट होऊ शकेल, असे पक्षाचे मत आहे. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान,छत्तीगडमध्ये सत्ता गमावली आहे.

खासदारांकडून मतदारसंघातील परिस्थितीचा अाढावा घेणार
लाेकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या सर्व खासदारांची अनाैपचारिक बैठक घेऊन मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेणार आहेत. २० डिसेंबर ते ३ जानेवारीपर्यंत त्यासंदर्भात बैठक हाेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत ३५ ते ४० खासदारांसाेबत पंतप्रधान नरेंद्र माेदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा चर्चा करणार आहेत. प्रत्येक केंद्रीय मंत्र्यास या बैठकीची जबाबदारी देण्यात आली.

सर्वसंमतीनेच राममंदिर व्हावे : गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, राममंदिर हा जातीय वा धार्मिक मुद्दा नाही. भगवान राम आमच्या इतिहास, संस्कृतीचे प्रतीक आहे. वादग्रस्त जागी मंदिर हाेते, हे सिद्ध झाले आहे. भारतात रामाच्या जन्मभूमीवर मंदिर हाेणार नाही तर कुठे हाेईल? राममंदिराच्या निर्मितीसाठी अनेक मार्ग आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. सर्वसंमतीने निर्णय हाेऊ शकताे. संसदेत दाेन तृतीयांश बहुमताने निर्णय हाेऊ शकताे. परंतु सर्वसंमती हा सर्वोत्तम उपाय असल्याचे गडकरी म्हणाले.
Ram mandir topic in BJP's conference

Post a comment

 
Top