0
धुळे, 31 डिसेंबर : धुळे महापालिकेच्या महापौर पदी भाजपचे चंद्रकांत सोनार यांची तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारानी महापौर उपमहापदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध पार पडली आहे.
या निवडीच्या विशेष महासभेत 74 पैकी 71 नगरसेवक उपस्थित होते. या सभेत नगरसेविका हेमा गोटे, शिवसेनेच्या जोत्सना पाटील आणि बसपच्या सुशिला इशी हे नगरसेवक गैरहजर होते. शहराचा विकास प्राधान्य क्रम राहिल असे नवनिर्वाचित महापौर सोनार यानी स्पष्ट केले. 15 कलमी कार्यक्रम उद्यापासूनच सुरू करण्यत येणार असल्याचेही सोनार यानी स्पष्ट केलं. या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता राखत दणदणीत विजय मिळवला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजपने घवघवीत यश मिळवलं होतं.  भाजपच्या  विजयामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला होता तर दुसरीकडे बंड पुकारून भाजपविरोधात थंड थोपटणारे अनिल गोटे यांचं पुरतं पानिपत झालं होतं.


विशेष म्हणजे, भाजपमध्ये गुंडांना उमेदवारी दिली असा आरोप करून भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी बंड पुकारलं होतं. अनिल गोटे यांनी लोकसंग्राम नावाचा पक्ष स्थापन केला होता. अनिल गोटे यांनी बंडखोरी केल्यानं धुळे महापालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. गोटे यांनी आपल्या घरात पत्नी हेमा आणि मुलगा तेजस गोटेला उमेदवारी देऊन मैदानात उतरवलं होतं. पण धुळेकर जनतेनं भाजपच्या पारड्यात मतं टाकत अनिल गोटे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीला साफ नाकारलं.भाजपचे चंद्रकांत सोनार धुळ्याचे नवे महापौर तर उपमहापौर पदी कल्याणी अंपळकर

Post a comment

 
Top