काही काँग्रेस नेते, अधिकाऱ्यांच्या व्याभिचारातून 'हिंदू दहशतवाद'चा जन्म
मुंबई - 'गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे नाव मी इशरत जहाँ प्रकरणात गोवावे यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांनी जंग-जंग पछाडले होते. मला सिगारेटचे चटके दिले. आई-वडिलांसमोर माझा छळ केला. मात्र, मी अत्याचार सोसला. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही,' असा गाैप्यस्फाेट केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अवर सचिव आरव्हीएस मणी यांनी बुधवारी केला. मणी लिखित 'हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड' या मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी ले. जन. दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते.
२६/११ च्या हल्ल्यास १० वर्षे पूर्ण झाल्याची पार्श्वभूमी व अतिरेक्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेले हॉटेल ताज यानिमित्त सदर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी मणी म्हणाले, महाराष्ट्राला हिंदूविरोधी प्रयोगशाळा करण्याचे षड््यंत्र केले होते. राष्ट्रवाद उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक कट होता. सैन्यातील समर्थ, सक्षम धैर्यशील अधिकारी कर्नल श्रीकांत पुरोहितची कारकीर्द ठरवून ठेचून काढली. हिंदू दहशतवाद प्रस्थापित करण्याचे कारस्थान रचले गेले. माझे पुस्तक हे या तथ्यावर आधारित आहे. संदर्भासह लिहिलेले आहे. मी लिहिलेले पुस्तक ही परिकल्पना नाही. कर्नल श्रीकांत पुरोहित आणि त्यांच्यासारखे जे हिंदू दहशतवादाच्या खोट्या कटात अडकले आहेत त्यांची सुटका होणे, हिंदू दहशतवादाचा डाग नष्ट होणे ही माझ्या पुस्तकाची उपलब्धी असेल, असे मणी यांनी सांगितले.
काही काँग्रेस नेते, अधिकाऱ्यांच्या व्याभिचारातून 'हिंदू दहशतवाद'चा जन्म
अनुवादक अरुण करमरकर म्हणाले, काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते, प्रशासनातील काही स्वार्थी अधिकाऱ्यांंच्या व्यभिचारातून हिंदू दहशतवाद नावाचे भेसूर जन्माला घातले गेले. हे पुस्तक त्या अभद्र युतीचे पाप मांडणारे आहे. फाळणीपासून लांगुलचालनाची भूमिका स्वीकारणाऱ्या काँग्रेसचा पर्दाफाश करणारे आहे. पुस्तकाचा अनुवाद करताना चीड-संताप-अस्वस्थता व अगतिकता अशा संमिश्र भावना होत्या. पण, अनुवाद करून राष्ट्रीय कर्तव्य केल्याची जाणीव उत्पन्न झाली आहे.

Post a Comment