लातूर - आपली पत्नी सतत एका महाराजाचे नाव घेत राहते. ती सांगूनही ऐकत नाही, असे म्हणत एका ७० वर्षीय व्यक्तीने रविवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात जाऊन स्वतःला पेटवून घेतले. आगीचे लोळ पाहून पोलिस आणि काही नागरिकांनी तातडीने धाव घेऊन आग विझवून वृद्धाला शासकीय रुग्णालयात दाखल केले असून या घटनेत तो ६० टक्के भाजला आहे. पोलिस ठाण्याच्या आवारातच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
विवेकानंद चौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नाथनगर परिसरात राहणारे चंद्रकांत गरड ( ७०) रविवारी सायंकाळी पोलिस ठाण्याच्या परिसरात आले. तेथे असलेल्या पाण्याच्या मोठ्या टाकीजवळ जाऊन त्यांनी रॉकेल अंगावर ओतले. काडीपेटी काढून त्यांनी स्वतःला आग लावली. आगीचा भडका पाहून परिसरात थांबलेले काही नागरिक आणि ठाण्यातील पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली. पाणी, कपडा टाकून आग विझवण्यात आली. पोलिसांनी त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयातही दाखल केले. गरड यांच्याकडे पेटवून घेण्यामागे प्राथमिक कारण विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर ऐकून पोलिस थक्क झाले.फोटोसमोर लोटांगण घालते पत्नी
गरड यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, माझी पत्नी एका महाराजांची भक्त आहे. ती सतत महाराजांचे नाव घेते. त्यांच्या फोटोसमोर बसून सतत जप करत असते. फोटोसमोर लोटांगण घालते.समजावून सांगण्यासाठी चिठ्ठ्याही लिहिल्या
गरड यांनी पत्नीला समजावून सांगणाऱ्या आणि महाराजांची भक्ती सोडण्याचे सांगणाऱ्या काही चिठ्ठ्याही पोलिसांना तपासात आढळल्या आहेत. पोलिसांना अद्याप या प्रकरणामागचे गूढ शोधता आलेले नाही. विशेष म्हणजे रात्री गरड यांची पत्नी रुग्णालयात पोहोचली. ती त्यांची सेवा करीत होती. गरड यांनी पेटवून घेतल्यामुळे घरातील सर्वांनाच मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी याबाबत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.६० टक्के भाजले, उपचार सुरू
पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे या प्रकरणाचा तपास करीत असून यामागे काही वेगळे कारण आहे काय, वृद्ध गरड यांची मानसिक स्थिती ठीक आहे काय, याचा तपास करीत आहेत. या प्रकरणात येत्या दोन दिवसांत काहीतरी ठोस माहिती निष्पन्न होईल, असे पोलिस निरीक्षक उबाळे यांनी सांगितले.
दरम्यान, गरड हे ६० टक्के भाजले असून त्यांच्यावर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment