0
 • police inspector murder news in uttar pradeshबुलंदशहर - गोहत्येच्या अफवेवरून बुलंदशहरातील हिंसाचारात पोलिस इन्स्पेक्टर सुबोधकुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ८७ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यात २७ जणांची नावे आणि ६० जण अज्ञात आहेत. काही आरोपी बजरंग दल, भाजयुमो आणि विहिंपशी संबंधित आहेत. मुख्य आरोपी योगेश राज हा बजरंग दलाचा जिल्हाप्रमुख आहे.स्याना गावातील भाजयुमोचा अध्यक्ष शिखर अग्रवाल व विहिंप कार्यकर्ता उपेंद्र राघवचेही आराेपींत नाव आहे. ते सर्व फरार आहेत. दुसरीकडे, हिंसाचारातील ठार तरुण सुमीतचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी नकार देत हाेते. कुटुंबीय म्हणाले, 'सुमीतची हत्या सुबोध यांनी केली आहे. सरकार त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये देत आहे. आम्हालाही इतकी भरपाई मिळावी.' मात्र, ५ लाख रुपयांच्या घोषणेनंतर ते अंत्यसंस्कारासाठी राजी झाले.

  इन्स्पेक्टरची पत्नी म्हणाली, अखलाक हत्याकांडाचा तपास केल्यामुळे हत्या 
  मुलाचा प्रश्न : हिंदू-मुस्लिम वादामध्ये उद्या कुणाच्या वडिलांचा बळी जाईल? 

  तिरिगवां गावात इन्स्पेक्टर सुबोध यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा धाकटा मुलगा अभिषेक म्हणाला, 'माझे वडील मला एक चांगला नागरिक बनवू इच्छित होते, जो समाजात धर्माच्या नावावर हिंसाचार करणार नाही. याच हिंदू-मुस्लिम वादामुळे माझ्या वडिलांचा बळी गेला. उद्या कुणाला पितृछत्र गमवावे लागेल? सुबोध यांच्या पत्नी रजनी म्हणाल्या, 'माझ्या पतीला धमक्या येत होत्या. अखलाक प्रकरणाचा तपास करत असल्यानेच त्यांच्यावर हल्ला झाला. हा सुनियोजित कट होता.' सुबोध यांची बहीण सुनीता यांनी पोलिसांवरच कटानुसार आपल्या भावाच्या हत्येचा आराेप केला आहे.
  उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर म्हणाले, हा संघाचा कट 
  सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते व योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर म्हणाले, बुलंदशहर हिंसाचार संघाचा कट आहे. यात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचाही समावेश आहे. पोलिसांनी अनेक भाजप नेत्यांची नावे घेतली आहेत. इज्तेमाच्याच दिवशी ही घटना का घडली? अशांतता पसरवण्याचा हा हिंदू संघटनांचा कट आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, सध्या एखाद्या संघटनेचे नाव घेणे घाईचे ठरेल. तपास अहवाल येईपर्यंत आधीच निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
  एफआयआरमध्ये घटनेेचे सत्य 
  १२:४३ वाजता योगेशने गोहत्येचा गुन्हा नोंदवला, ५२ मिनिटांनी त्याच्या नेतृत्वातच
  इन्स्पेक्टरची हत्या झाली 
  बजरंग दलाचा जिल्हाप्रमुख योगेश हा सोमवारी काही लोकांसोबत चिंगरावठी पोलिस चौकीत आला. १२:४३ वाजता गुन्हा दाखल झाला. यानंतर योगेश गेला. पोलिसांनी योगेशसह ८७ लोकांविरुद्ध इन्स्पेक्टर सुबोध यांच्या हत्येच्या आरोपात दुसरा गुन्हा दाखल केला. पोलिस रेकाॅर्डनुसार ही घटना १:३५ वाजता झाली. म्हणजेच गोहत्येचा गुन्हा दाखल झाल्याच्या ५२ मिनिटांनी. सबइन्स्पेक्टर सुभाषचंद्र यांच्या तक्रारीवरून दाखल या गुन्ह्यानुसार, योगेश राजच्या नेतृत्वात जमलेल्या जमावानेच इन्स्पेक्टर सुबोध यांची हत्या केली.

  योगेशच्या तक्रारीत वडिलांचे नाव, मात्र त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात नाही : पोलिस योगेशच्या संघटनेचे नाव सांगत नाहीत. गुन्ह्यात त्यांच्या वडिलांचे नावही दिलेले नाही. मात्र, त्याने जेव्हा गोहत्येची तक्रार दिली तेव्हा वडिलांचे नाव सूरजभान असे लिहिले.

Post a Comment

 
Top