0
 • मुंबई - गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात पाळेमुळे रुजवण्यात सपशेल अपयशी ठरलेल्या आम आदमी पक्षाने (आप) अागमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात पक्षविस्तारासाठी प्रयत्न चालवले अाहेत. त्यांच्याकडून सध्या आंबेडकरी जनतेला चुचकारण्याचा मोठा प्रयत्न चालवला आहे. त्याचाच भाग म्हणून 'आप'ने यंदा प्रथमच बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनी (६ डिसेंबर) चैत्यभूमीवर जाहीर सभा ठेवली आहे. त्या सभेला दिल्लीचे मंत्री हजेरी लावणार असून सभेत बड्या रिपाइं नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
  २०१३ या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आम आदमी पक्ष महाराष्ट्रातही पाया शोधण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातूनच ब्रिगेडियर सुधीर सावंत (मुंबई) या बहुजन चेहऱ्याच्या हाती पक्ष दिला. जिजाऊंच्या जन्मदिनी सिंदखेड राजा येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रॅलीसुद्धा केली. त्याच प्रकल्पाचा भाग म्हणून यंदा बाबासाहेबांच्या ६२ व्या महापरिनिर्वाणदिनी (गुरुवारी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चैत्यभूमीवर येणार होते. त्यानिमित्ताने रिपाइंमधील अनेक बडे नेते 'आप'च्या व्यासपीठावर हजेरी लावणार होते. त्यासाठी संविधान मोर्चा या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पण ऐनवेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मुंबईच्या सभेस येण्यास नकार दिला. त्याऐवजी दिल्लीचे एक मंत्री राजेंद्र पाल गौतम हजर राहणार आहेत.
  महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर दरवर्षी अनेक रिपाइंचे अनेक गट सभांचे आयोजन करत असतात. पण, या वेळी प्रथमच रिपाइंच्या परिघाबाहेरील 'आप'सारख्या देशपातळीवरील एका राजकीय पक्षाने सभेचे आयोजन केले आहे. त्या सभेला रिपाइं नेते अर्जुन डांगळे, नानासाहेब इंदिसे, सुरेश गायकवाड अादी रिपाइं नेते उपस्थिती लावणार आहेत.
  कोरेगाव भीमा (जि. पुणे) दंगलीनंतर आंबेडकरी जनतेच्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. त्यात आम अादमी पक्षही स्वत:ची जागा शोधतो आहे. त्यातूनच 'आप'ने उद्या चैत्यभूमीवर रॅली व एका सभेचे आयोजन केले असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
  गुन्हेगारी नेता व्यासपीठावर येण्यामुळे केजरींची पाठ 
  मुंबईच्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनी गुरुवारी अापची जी सभा होणार आहे, त्या वेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एक बडा नेता व्यासपीठावर असणार आहे. 'या सभेला तुम्ही हजर राहिलात तर लोक प्रश्न उपस्थित करतील', अशी टीप मुंबईतून आपच्या नेत्यांनी केजरीवाल यांना दिली. त्यामुळे ऐनवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येण्याचे टाळले, अशी माहिती 'आप'मधील सूत्रांनी दिली.
  चैत्यभूमीवर यंदा बाबासाहेबांच्या भाषणांच्या १८ खंडांचा खजिना 
  'जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हा दुर्मिळ ग्रंथ उपल
  ब्ध 
  मुंबई - डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या ६२व्या महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेब अांबेडकर यांच्या लेखन अाणि भाषणाचे १८ खंड उपलब्ध हाेणार अाहेत. परंतु सर्वाधिक मागणी असलेला डाॅ. बाबासाहेबांवरील चित्रमय ग्रंथाचा २२ वा खंड उपलब्ध नसल्याने असंख्य पुस्तकप्रेमींची निराशा हाेणार अाहे. गेल्या अनेक वर्षांपासून अाऊट अाॅफ प्रिंट असलेले डाॅ. बाबासाहेब अांबेडकर लिखित "जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हे पुस्तक शासकीय मुद्रणालयाने केवळ १५ रुपयांत उपलब्ध करून दिल्याने अनुयायी व अभ्यासकांना माेठा दिलासा मिळणार अाहे. शासकीय मुद्रणालयाकडून प्रकाशित होणाऱ्या नवीन खंडाबद्दल नेहमीच उत्सुकता असते. यंदा डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचे लेखन अाणि भाषणांचे १८ खंड चैत्यभूमीवर उपलब्ध होणार अाहेत. त्यातच चित्रमय ग्रंथ असलेला २२ वा खंडही महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी उपलब्ध हाेणार नसल्याने अांबेडकर अनुयायी अाणि पुस्तकप्रेमींची निराशा हाेणार अाहे. ५०० रुपये किंमत असलेला हा खंड यंदा जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झाला. त्यानंतर एक ते दाेन महिन्यांतच त्याच्या प्रती संपल्या. शासकीय मुद्रणालयाचे प्रभारी संचालक मनाेहर गायकवाड म्हणाले, यंदा डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचे 'जातिव्यवस्थेचे निर्मूलन' हे पुस्तक उपलब्ध करून दिले अाहे. या पुस्तकाची माेठ्या प्रमाणावर मागणी हाेती. ही मागणी लक्षात घेऊन या पुस्तकाच्या १५ हजार प्रती छापण्यात अाल्याचे त्यांनी सांगितले.
  'AAP' meeting on Chaityabhoomi today

Post a Comment

 
Top