0
लातूर- लातूर शहरातील युवक काँग्रेसची कार्यकर्ती कल्पना गिरी हिच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी महेंद्रसिंह चौहान याला अखेर पावणेपाच वर्षांनंतर जामीन मिळाला आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लातूरमध्ये आलेल्या नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी जाहीर सभेत कल्पना गिरीच्या खून प्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे हे प्रकरण देशपातळीवर पोहोचले होते.

लातूर येथील युवक काँग्रेसमध्ये कल्पना मंगल गिरी ही कार्यरत होती. ती २१ मार्च २०१४ रोजी घरातून एका कार्यक्रमासाठी ती बाहेर पडली होती. त्यादिवशी रंगपंचमीचा सण होता. सायंकाळी घरी परतणारी कल्पना रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र २२ तारखेला तिचा मृतदेह तुळजापूरजवळील एका तलावात आढळून आला. याप्रकरणी कल्पनाचे वडील मंगल गिरी यांनी लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कल्पनाचा खून लातूर शहर विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचा तत्कालीन अध्यक्ष असलेला महेंद्रसिंह चौहान यानेच केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला. याप्रकरणी २७ मार्च रोजी एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी महेंद्रसिंह चौहान २९ मार्च रोजी पोलिसांसमोर हजर झाला. त्याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाला राजकारणाचे रंग चढले. महेंद्रसिंह चौहान याने कल्पनावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप कल्पनाच्या कुटुंबीयांनी केला. तसेच या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी महेंद्रसिंहचे वडील तथा लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान, त्यांच्या परिचयातील दिवाकर शेट्टी यांच्यावरही या प्रकरणात आरोप करण्यात आले. या प्रकरणात महेंद्रसिंह चौहान आणि त्याचा मित्र समीर किल्लारीकर हे दोन मुख्य आरोपी होते. तर माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह चौहान, हाॅटेल व्यावसायिक दिवाकर शेट्टी, चौहान कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले कुलदीपसिंह ठाकूर आणि आणखी एक असे चार सहआरोपी होते. यातील सहआरोपींनाही पुढे अटक झाली. दरम्यान, त्याचवेळी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी लातूरमध्ये येऊन या प्रकरणात चौकशीची आणि कडक कारवाईची मागणी केली. शिवसेनेने या प्रकरणात आंदोलन उभे केले. यामुळे हे प्रकरण त्यावेळी प्रसिद्धी माध्यमात चांगलेच गाजले होते.

आरोपीनेच केली नार्कोची मागणी :
सामान्यपणे फिर्यादींकडून प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी आरोपीच्या नार्को चाचणीची मागणी करीत असतात. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या महेंद्रसिंह चौहान याने सातत्याने न्यायालयात आपली नार्को चाचणी करावी अशी मागणी लावून धरली होती. एवढेच नव्हे तर दोन वेळा या मागणीसाठी कारागृहात उपोषणही केले होते. त्याचबरोबर महेंद्रच्या कुटुंबीयांनीही एक-दोन वेळा याप्रकरणी एकदिवसीय धरणे, उपोषण करीत नार्को चाचणीची मागणी केली होती. ही चाचणी केली तर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल असे चौहान परिवाराचे म्हणणे होते. परंतु सीबीआयने नार्को चाचणीला विरोध केला.

मोदींनी केला होता घटनेचा उल्लेख 
निवडणुकांच्या तोंडावर लातूरमध्ये प्रचारासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी कल्पना गिरी खून प्रकरणाचा उल्लेख आपल्या भाषणात केला. दिल्लीमधील तंदूर कांडचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसची संस्कृती तंदूर ते लातूर अशी असल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली. त्यामुळे देशभरातील माध्यमांनी पुन्हा एकदा कल्पना गिरी खून प्रकरणाची दखल घेतली. पुढे राज्य शासनाने या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. परंतु निकम काही सुनावण्यानंतर या खटल्यातून बाहेर पडले. या प्रकरणातील सहआरोपींना अटीशर्तींवर जामीन मिळाला. परंतु मुख्य आरोपी पावणेपाच वर्षांपासून कारागृहात होते. अखेर या प्रकरणात मुख्य आरोपी चौहान याला लाख रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन मिळाला असून पासपोर्ट पोलिस ठाण्यात जमा करणे, लातूर जिल्ह्यात प्रवेश न करणे, जामीन कालावधीत पोलिसांना पत्ता कळवणे अशा अटींवर मुक्तता केली आहे.

तपास अधिकारी बदलले 
या प्रकरणातील तपास अधिकारीही सातत्याने बदलत गेले. प्रारंभी एमआयडीसी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सीआयडी आणि नंतर सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला. जून २०१४ मध्ये सीआयडीने यातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेले. परंतु सीबीआयकडून फारसा तपास झाला नाही. २०१४ नंतर सीबीआयने दोषारोपपत्रच दाखल केले नाही.Five years after the accused get bail in the Giri murder case

Post a comment

 
Top