0
परवाना नसताना दिले मुलाला वाहन चालवण्यास

नाशिक : दोन कारच्या धडकेत तीन महिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या स्कोडा कारचालक मुलाला तीन वर्ष सक्तमजुरी, तर पित्याला तीन महिने सक्तमजुरी शिक्षा अाणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. बुधवारी (दि. १९) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती जी. के. आर. टंडन यांनी हा निकाल दिला.

अभियोग कक्ष अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०१७ रोजी आरोपी शेख फैज फारुख (२०, रा. आयेशानगर) याने स्कोडा सुपर्ब कार भरधाव चालवून हर्षद श्यामकुमार पाटील यांच्या स्विफ्ट डिझायर कारला जोराची धडक दिली. त्यात कारमधील नववधू सरिता भामरे, रेखा पाटील व योगिनी भामरे या ठार झाल्या. आरोपीच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपघात आणि हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक एन. जे. कंडरे यांनी केला. चालकाचा पिता फारुख हबीब शेख याने मुलाकडे परवाना नसताना कार चालवण्यास दिल्याचे तपासात उघडकीस आले. दोन्ही आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा करून गुन्हा सिद्ध होण्याच्या दृष्टीने तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी टंडन यांनी साक्षीदाराची साक्ष, तपासी अमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे श्रीमती चंद्रलेखा पगारे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी महेश मोरे यांनी पाठपुरावा केला.

पहिलीच शिक्षा

परवाना नसलेल्या मुलाला वाहन चालवण्यास दिल्याने पित्याला दोषी ठरवत त्यालाही तीन महिने शिक्षा ठोठावण्यात आली. अपघाताच्या गुन्ह्यात प्रथमच पित्याला दोषी ठरवत शिक्षा देण्यात आली आहे.
Nashik Hit and run case,

Post a Comment

 
Top