0
नाशिक- शहरात विविध ठिकाणी अवैध गुटखा गोदामांवर पोलिसांकडून छापे सत्र सुरू असल्याने शहर गुटखा गोदामांचे आगार बनले असल्याचे या कारवाईतून निदर्शनास येत आहे. शुक्रवारी रात्री उपनगर पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून तब्बल ४१ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला. दोन दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वणीरोडवर सुमारे ४५ लाखांचा गुटखा जप्त केला होता. विशेष ही कारवाई पोलिसांकडून केली जात असताना याकडे मात्र अन्न व सुरक्षा प्रशासन विभागाचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा रंगत आहे. गुटखा शहरातील एका बड्या साठेबाजांच्या गोदामात उतरवला जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाण्याचे गस्तीवरील गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी संशयित आयशर ट्रक (जी.जे. २७ व्ही ८०२८) थांबवला. ट्रकचालकास आत काय माल आहे याबाबत पाेलिसांनी विचारणा केली असता दोघांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पाेलिस पथकाने अायशर वाहनाची तपासणी केली असता बिस्किटांच्या बॉक्समध्ये गुटखा आढळून आला. याबाबत अन्नसुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे यांच्या पथकाने तपासणी केली असता विविध कंपनीचा सुमारे ४१ लाख ६५ हजारांचा अवैध गुटखा मिळून आला.

याप्रकरणी संशयित संतोष परमानंद यादव (रा. अहमदाबाद) यास पाेलिसांकडून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अन्नसुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक गणेश जाधव, प्रवीण कोकाटे, समीर चंद्रमोरे, किरण देशमुख, राहुल खांडबहाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बिस्किटाच्या बॉक्समध्ये गुटखा
पथकाने ट्रकमधील बिस्किटांच्या बॉक्सची तपासणी केले. यामध्ये सुरुवातीला बिस्किटे आढळले. पथकाला सुरुवातीला माहिती चुकीची असल्याचे जाणवले. मात्र, पथकाने सर्वच बॉक्सची तपासणी केली असता बिस्किटाच्या खाली गुटखा आढळून आला.

काठे गल्ली, पंचवटीत गाेदाम
अवैध गुटखा गुजरातमार्गे शहरातील गोदामांमध्ये साठा केला जातो. येथून राज्यातील विविध शहरांत हा अवैध गुटखा विक्रीसाठी पाठवला जातो. काठे गल्ली, पंचवटी आणि जिल्ह्याच्या बाहेर या साठेबाजांची गोदामे असल्याची चर्चा आहे.

अवैध तस्करी, पोलिसांचे लागेबांधे
पंचवटी, काठे गल्ली येथील गोदामांना स्थानिक पोलिस ठाण्याच्या 'सुभेदारांचा'चा आशीर्वाद आहे. या गोदामात बिस्कीट, कॉस्मेटिक आणि साबणाच्या एजन्सीच्या आड गुटख्याची तस्करी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.The Gutkha storehouse built in Nasik, FDA Department is in doubt

Post a Comment

 
Top