0
उत्तर भारतीय महापंचायत अध्यक्ष विनय दुबे यांना पाेलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई- कल्याण शहरात मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त महापालिका प्रशासनाने शहर चकाचक केले असून कल्याणच्या जनतेला 'अच्छे दिन'चा अनुभव येत आहे. दरम्यान, उत्तर भारतीय महापंचायतीने मात्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला असून काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे.

कासार वडवली-भिवंडी-कल्याण या मेट्रो टप्पा क्रमांक ५ तसेच पंतप्रधान आवास योजनेतील ९० हजार घरांच्या भूमिपूजनाचा समारंभ मंगळवारी राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानात पंतप्रदान मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. फडके मैदानाच्या जवळच कल्याण-डोंबिवली महापालिकेचा आधारवाडी कचरा डेपो आहे. कचरा डेपोतून दुर्गंधी येऊ नये म्हणून महापालिकेकडून रसायनांची फवारणी करण्यात येत आहे. तसेच डेपोला आग लागू नये यासाठी २४ तास ३० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, माेदींच्या दाैऱ्याला विराेध करुन त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देणारे उत्तर भारतीय महापंचायतीचे अध्यक्ष विनय दुबे यांना दादरमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. दुबे यांनी मागच्या महिन्यात मुंबईत उत्तर भारतीय महापंचायतीचे आयोजन केले होते. त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी अापल्या पक्षाची उत्तर भारतीयांविराेधातील भूमिका स्पष्ट केली हाेती.


'मुंबईत परप्रांतीय लाेकांचे लाेंढे वाढत असल्याने मराठी लाेकांचा राेजगार हिरावला जात अाहे. त्यामुळे अाम्हाला अाक्रमक भूमिका घ्यावी लागते. तुमच्या भागातील नेते (उत्तर भारतीय) त्या राज्यात राेजगार उपलब्ध करुन देत नसल्याने तुम्हाला स्थलांतर करण्याची वेळ येते. त्यामुळे तेथील विकासासंदर्भात तुम्ही (उत्तर भारतीय) तुमच्या नेत्यांना जाब का विचारत नाही?, असा सवाल राज ठाकरेंनी केला केला होता. राज यांची ही भूमिका पटल्यानंतर उत्तर भारतीय महापंचायतीने यापुढे उत्तर भारतातून निवडून आलेल्या नेत्यांना मुंबईत प्रचारासाठी येऊ देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. त्याच पार्श्वभूमीवर अाता महापंचायतीने पंतप्रधानांना कल्याण दौऱ्यात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येऊनही त्यांनी तेथील विकास केला नाही, असा महापंचायतीचा आरोप आहे.

शिवसेनेचा बहिष्कार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण येथील कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपने निमंत्रित केलेले नाही. त्यामुळे शिवसेना या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सत्ताधारी युतीतील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे अाहेत.

माेदींच्या सभेसाठी भाजप ५० हजार कार्यकर्ते अाणणार
माेदींचे अागमन हाेत असलेले हेलिपॅड ते सभास्थळ या मार्गावरील सुमारे १५० अतिक्रमणे रविवारी कल्याण महापालिकेने जमीनदोस्त केली. ५० फूट रस्ता सोडून अधिकृत असलेल्या टपऱ्या नोटीस न देता पाडण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पंतप्रधानांचा ताफा येणाऱ्या मार्गावरील गतिरोधक हटवण्यासाठी रविवारी १० जेसीबी कार्यरत होते. सभेला भाजपचे ५० हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
Raj Thackeray says, don's allow modi to north india

Post a comment

 
Top