0
बहुचर्चित वर्धन घोडे (वय १०, रा. टिळकनगर) खून खटल्याचा निकाल शुक्रवारी (दि. १४) लागला. आरोपी अभिलाष मोहनपूरकर आणि श्याम मगरे (दोघेही रा. टिळकनगर) या दोघांनाही जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी दुहेरी जन्मठेप ठोठावली. यामध्ये दोघांनाही मरेपर्यंत जन्‍मठेप होणार आहे.  या खटल्यात तीस सुनावण्या झाल्या. एकूण ४१ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये वर्धनचा खून होण्यापूर्वी तो आरोपींसोबत होता, हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, डीएनए रिपोर्ट आणि पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांची साक्ष महत्त्वाची ठरली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.
या खून खटल्यात कलम ३०२ व १२० (ब) नुसार वेगवेगळी जन्मठेप सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात शासनाने नाशिकचे वकील अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्‍ती केली होती. तर, येथील दिलीप खंडागळे यांनी फिर्यादीतर्फे काम पाहिले.  २७ फेब्रुवारी २०१७ रोजी आरोपी अभिलाष आणि श्याम या दोघांनी पाच कोटींच्या खंडणीसाठी वर्धनचे अपहरण करून दौलताबादच्या घाटात गळा आवळून खून केला. गुन्हा नोंद करताच संशयावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. या प्रकरणात मागील सात महिन्यांपासून युक्तीवाद सुरु होता. न्यायालयासमोर ३० सुनवण्या झाल्या. यामध्ये ४१ जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. पोलिसांनी खटल्यात ७५० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने शंभर पानी निकालपत्र दिले आहे. या प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी वर्धनच्या नातेवाईकांनी न्याय कक्षात गर्दी केली होती. अभिलाष आणि श्याम या दोघांना पोलिसांनी बंदोबस्तात आणले होते. अभिलाषच्या चेहर्‍यावर शिक्षेची भिती स्पष्ट  दिसत होती तर श्याम न्याय कक्षात निरविकार चेहर्‍याने बसला होता. या प्रकरणाचा तपास करणारे सर्व पोलिस अधिकारीदेखील यावेळी उपस्थित होते.  

१ वर्षे १० महिन्यात शिक्षा

२७ फेब्रुवारी २०१७ रोजी वर्धनचा खून झाला होता. तत्कालिन पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी विशेष तपास पथक स्थापन करून तत्काळ आरोपींना अटक केली होती. तीन महिन्या आधी दोषारोपपत्र दाखल केल्यावर शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांची निवड केली. सात महिन्यांपासून या प्रकरणाच्या साक्षीपुराव्याला सुरूवात झाली. एक वर्षे दहा महिन्यात न्यायालयाने या खटल्याचा निकाला दिला. विशेष म्हणजे, अंडर ट्रायल सुनावणी झाली. यादरम्यान, चार वेळा आरोपींचा जामीन नामंजूर करण्यात आला. 

नेमके काय झाले होते

२७ फेब्रुवारी २०१७ रोजी दौलताबाद घाटात दहा वर्षाचा वर्धनचा गळा घोटून खून करण्यात आला होता. त्याचा मृतदेह टिळक नगरातील एका नाल्यात फेकून देण्यात आला होता. याच दरम्यान पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची चिठ्ठी सापडली होती. विशेष म्हणजे ही चिठ्ठी अभिलाषलाच सापडली होती त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला होता. पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान अभिलाष आणि श्यामच्या विरोधात अनेक पुरावे सापडले. तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने तीन महिने तपास करुन सक्षम  तांत्रिक पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आता पर्यंत संशयित आरोपींनी  चार वेळा जामिनासाठी अर्ज केले ते न्यायालयाकडून फेटाळण्यात आले. 

यांनी घेतली मेहनत

जवाहरनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर, अविनाश आघाव यांच्यासह विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल खटावकर, उपनिरीक्षक काशीनाथ महांडुळे, हवालदार बडगूजर  यांचा या पथकात सहभाग होता. घोडे कुंटुबियांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर या प्रकरणी  नाशिकचे विशेष  सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी फिर्यादीपक्षाकडून बाजू मांडली. त्यांच्यासोबत वकील दिलीप खंडागळे, विजय काळे आणि सुरेश गायकवाड यांनीदेखील बाजू मांडली.

Post a Comment

 
Top