0
मत्रेवाडी (ता. पाटण) येथे बुधवारी मध्यरात्री शार्टसर्किटने लागलेल्या आगीत दहा खणाचे घर जळून खाक झाले. यात सहा कुटुंबाचे सुमारे 12 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सहा कुटुंबांनी आयुष्यभर काबाडकष्ट करुन उभा केलेले  संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे ऐन थंडीच्या महिन्यात ही कुटुंबे उघडय़ावर पडली आहेत. 
वांग-मराठवाडी धरणाच्या दक्षिणेला डोंगराच्या कुशीत मत्रेवाडी हे छोटे गाव आहे.  येथील नवीन पिढी मुंबईला नोकरीनिमित्त स्थायिक असली तरी बहुतांश लोक गावातच राहून शेतीसह पशुपालन व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
बुधवारी दिवसभर रानात राबून थकलेले लक्ष्मण रामचंद्र मत्रे, भगवान बापू मत्रे, ज्ञानदेव भगवान मत्रे, शामराव रामचंद्र मत्रे, सुरेश विठ्ठल मत्रे, संजय बाळकू मत्रे हे रात्री गाढ झोपेत होते. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्कीटने अचानक आग लागली. यावेळी दावणीला असणारे एक वासरू आगीमुळे दावण तोडून धावत सुटले. ते दरवाजास धडका मारू लागले. यामुळे घरातील लोक जागे झाले, तोपर्यंत घराला आग लागून आगीने रौद्ररूप धारण केले होते. यामध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
प्रसंगावधान साधून जनावरांना बाहेर काढण्यात गावकऱयांना यश आले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेजारील घरांना धोका होऊ नये व आग आटोक्यात यावी, यासाठी गावातील सर्वजण प्रयत्न करत होते. चार कुपनलिकांना पाईप जोडून पाणी  मारून व घरातील सर्व पाण्याचा वापर करून गावकऱयांनी आग आटोक्यात आणली. मात्र सहा कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. जळिताचा पंचनामा तलाठी डी. जी. कोडापे, कोतवाल आर. टी. पुजारी यांनी केला. या कुटुंबांना तातडीची जास्तीत जास्त मदत व्हावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Post a Comment

 
Top