0
सारे काही मीच केले म्हणण्यात अर्थ नाही- सरसंघचालक डाॅ. भागवतांचा माेदींना 'गीताेपदेश'

 • मुंबई- 'आधीच्या सरकारांच्या तुलनेत भाजप सरकारचे संस्कार, कामाची धडाडी आणि सामाजिक जाणिवा अधिक प्रगल्भ असल्यानेच आम्ही अगोदरच्या सरकारच्या शेवटच्या चार वर्षांच्या तुलनेत अधिक विकास करू शकलो,' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केला. महाराष्ट्र ही आशाआकांक्षांची भूमी असून मुंबई आणि ठाणे ही संपूर्ण देशाची स्वप्ने साकार करणारी शहरे आहेत. त्यामुळे या भागाच्या विकासावर आमचा भर असल्याचे ते म्हणाले.

  ठाणे- भिवंडी- कल्याण, दहिसर पूर्व-मीरा भाईंदर या दाेन मेट्रो प्रकल्पांच्या कल्याणमध्ये झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बाेलत हाेेते. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांत आम्ही मुंबई आणि परिसराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ३३ हजार कोटींचे विविध प्रकल्प हाती घेतले. आधीच्या सरकारने २००६ ते २०१४ या कालावधीत ११ किमी लांबीचा फक्त एक मेट्रो रेल्वेमार्ग पूर्ण केला. याउलट आमच्या सरकारने २७५ किमी लांबीच्या मेट्रो रेल्वेमार्गाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. २०२४ पर्यंत हे सर्व प्रकल्प पुर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  ठाणे-भिवंडी-कल्याण तसेच दहिसर पूर्व-मीरा भाईंदर मेट्रो मार्ग क्रमांक ९ या १५ हजार कोटींच्या या प्रकल्पांची क्षमता ११ लाख प्रवाशांची असणार आहे. सिडकोच्या माध्यमातून ९० हजार घरांच्या देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण योजनेचेही पंतप्रधानांनी भूमिपूजन केले. यापैकी ५३ हजार घरे ही आर्थिक दुर्बल घटकांसाठी तर ३७ हजार घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी असणार असून तीन वर्षांत हा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
  माेदींनी आपल्या भाषणात गेल्या साडेचार वर्षातील विविध योजनांचीच उजळणी केली. देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचवतानाच विजेची बचत करण्यासाठी ३० कोटी एलईडी बल्बचे वाटप केल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, त्यामुळे वीज बिलात १६ हजार कोटींची बचत झाली. एकट्या महाराष्ट्रात अकराशे कोटींनी विजेचे बिल घटल्याचे ते म्हणाले.
  अटलजींचे सरकार आणखी टिकले असते तर मेट्रोचे जाळे वाढले असते 
  डझनभर शहरांत आम्ही मेट्राेचा विस्तार करत असून आगामी काळात ही सेवा इतर शहरांतही विस्तारली जाईल. आधीच्या सरकारने दळणवळणाला महत्त्व दिले नाही, आम्ही मात्र दळणवळणाचे देशभरात नेटवर्क तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातच खरे तर मेट्राे प्रकल्पांना गती मिळाली. त्यांच्या सरकारला थोडा अधिक वेळ मिळाला असता तर पुणे, मुंबईसह देशभरात मेट्रोचे जाळे यापूर्वीच विकसित झाले असते,' असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
  'शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाइन ३'च्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर ते बाेलत हाेते. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो ही नवीन पॉलिसीनुसार पीपीपी तत्त्वावर साकारली जाणारी पहिलीच मेट्रो आहे. याद्वारे हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना गतिमान प्रवासाची साेय उपलब्ध हाेईल. नवीन मेट्रो पॉलिसीमुळे एका छताखाली सर्व सुविधा विकसित करण्यात येत आहेत, त्यामुळे कामात गतिमानता येण्यास मदत होत आहे, असा दावा माेदींनी केला.
  आमची साेसायटी त्यांच्याप्रमाणे 'आदर्श' नसेल; काँग्रेसला टाेला 
  २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाचे स्वत:चे घर असावे या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अगोदरच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या चार वर्षांत २५ लाख पन्नास हजार घरे बांधली, तर आमच्या सरकारने गेल्या चार वर्षांत त्यांच्या पाचपट म्हणजे तब्बल १ कोटी ५० हजार घरांची उभारणी केली. सामान्य परिवाराची स्वप्ने साकार करणारी एक आदर्श सोसायटी आम्हाला तयार करायची आहे. मात्र ही सोसायटी अगोदरच्या सरकारच्या (अशाेक चव्हाण यांच्या) 'आदर्श सोसायटी'सारखी नसेल, असा टोलाही माेदींनी मुंबईत लगावला.
  सारे काही मीच केले म्हणण्यात अर्थ नाही- सरसंघचालक डाॅ. भागवतांचा माेदींना 'गीताेपदेश' 
  'संघात आम्ही सांगतो की दिलेले काम समरसून, उत्कटतेने करायचे. पण त्यात गुंतायचे नाही. आपण करतो म्हणून एखादे काम होते असा अहंकार करायचा नाही. 'मी करतो,' 'मीच केले' असे कोणी म्हणत असेल तर त्याला अर्थ नसतो. खूप प्रयत्न करूनही कधी कधी भाग्य नसल्याने फळ मिळत नाही. त्यामुळे सिद्धी-असिद्धीपासून निर्विकार राहून काम करत राहिले पाहिजे. कार्यकर्ता म्हणून हे गुण अंगी असले पाहिजेत,' असे विचार सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांनी मंगळवारी पुण्यात मांडले. आधीच्या सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारने माेठ्या प्रमाणावर विकास केला, असा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना सरसंघचालकांचा टाेला चपखल बसला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

  गीताधर्म मंडळाच्या 'गीतादर्शन' मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ उद‌्घाटन आणि स्मरणिका प्रकाशन कार्यक्रमात डाॅ. भागवत बाेलत हाेते. काँग्रेसला हुरूप वाटावा असेही शब्द डॉ. भागवत बोलून गेले. ते म्हणाले, 'तरुणपणी एका नगराचा प्रचारक म्हणून मी बाहेर पडलो आणि सहा महिन्यांतच आणीबाणी लागली. भूमिगत व्हावे लागले. शाखा बंद झाल्या. त्या वेळी वरिष्ठांकडे मी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, 'तू करत राहा.' लवकरच निवडणूक जाहीर झाली. ज्येष्ठांशी आमची चर्चा सुरू झाली की निवडणुकीत काय होणार? त्यांचे उत्तर आले 'सगळे विरोधी पक्ष एकत्र होऊन लढले तर त्यांच्या २७६ जागा निवडून येतील.' त्यावर आम्ही तरुण स्वयंसेवक सगळे हसलो. पण त्यांचे खरे ठरले.' म्हणून फळ काय मिळाले याचा विचार न करता आपले प्रयत्न चिकाटीने सतत करत राहिले पाहिजेत. गीतेचा हाच संदेश आहे, असे डॉ. भागवत यांनी सांगितले.
  शिवसेना-भाजपकडून बहिष्काराचे राजकारण
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कल्याण येथे मेट्रो प्रकल्प आणि सिडकोच्या घरांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी केले. उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने शिवसेना नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. त्याचा वचपा काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कोस्टल रोडचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांना डावलून केले, त्यामुळे या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकला होता. यावरुन युतीत तणावाचे वातावरण वाढत असल्याचे दिसते. २०१६ मध्ये माेदींच्या हस्ते पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचेही ठाकरेंना निमंत्रण नसल्याने शिवसेनेने बहिष्कार घातला. भाजपने याचा वचपा काढत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाेणाऱ्या मुंबईच्या ई विभागातील ब्रिटानिया पंपिंग स्टेशन कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. फेब्रुवारीमध्ये माेदींनी नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेनेचे स्थानिक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींची नावे नसल्याने शिवसेनेने बहिष्कार घातला होता. त्यापूर्वी ११ सप्टेंबर २०१५ रोजी मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मेट्रो प्रकल्प भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार घातला होता. गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजपमधील हे शीतयुद्ध महाराष्ट्र अनुभवत आहे.The country's dynamic development by our government, Modi

Post a comment

 
Top