0
निपाणी शहरातील मुख्य मार्ग म्हणून जुन्या पी. बी. रोडकडे पाहिले जाते. या मार्गावर वाढती रहदारी लक्षात घेऊन पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. यानंतर पादचाऱयांसाठी लाखोचा निधी खर्च करून फुटपाथ निर्माण करण्यात आले. पण हे फुटपाथ सध्या व्यावसायिक अतिक्रमणात गुरफटून गेले आहेत. काही ठिकाणी या फुटपाथवर बेकायदा केले जाणारे वाहनांचे पार्किंग अडगळ ठरत आहे. तरीही पालिका प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
निपाणी शहराला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्याने शहराची व्याप्ती झपाटय़ाने वाढत आहे. शहराकडे वाढणारा ग्रामीण भागाचा ओढा हा व्यावसायिक वृद्धीसाठी पूरक ठरत आहे. यातून ही संधी साधण्यासाठी व्यावसायिक स्पर्धाही वाढू लागली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिकतर व्यावसायिक आपली दुकाने दुकानात कमी पण रस्त्यावर अधिक मांडत आहेत. यामुळे व्यावसायिक अतिक्रमण वाढले आहे. परिणामी फुटपाथवर व्यवसाय थाटण्याचे प्रकारही वाढीस लागत असून हे अतिक्रमण फुटपाथना गुरफटून टाकल्याने त्याचे अस्तित्वच नष्ट होत आहे.

Post a Comment

 
Top