0
पाचवड : देशातील काश्मीर, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, तिरुअनंतपुरम, रांची व गोवा या सहा ठिकाणांहून स्वस्थ भारत यात्रा निघाली आहे. तिरुअनंतपुरम येथून निघालेली ही यात्रा मंगळवार, दि. ४ रोजी पाचवड येथील महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज याठिकाणी आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यायातील विद्यार्थ्यांनी ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत पौष्टिक आहार घेण्याची शपथ घेतली.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. बी. कोडगिरे, अन्न सुरक्षा प्राधिकरण मुंबईचे सहायक आयुक्त व्ही. के. पंचम, जिल्ह्याचे अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनावणे व मुख्याध्यापक भागवत कणसे उपस्थित होते.
विद्यार्थी-विद्यार्थिनी व युवा पिढीने शरीर व मन स्वस्थ ठेवण्यासाठी काय खावे व काय खाऊ नये, याबाबतची सविस्तर माहिती सांगण्यात आली. आपल्या दैनंदिन आहारामधील साखर, मीठ व तेलाचे प्रमाण योग्य ठेवल्यास त्याचा शरीरावर कशाप्रकारे चांगला परिणाम होतो तसेच मानवी जीवनामधील आहाराचे महत्त्वही यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी यावेळी पौष्टिक आहार घेण्याची प्रतिज्ञा घेतली.
महात्मा गांधीजींनी सुदृढ भारतची हाक दिली होती. त्या अनुषंगाने या यात्रेचे आयोजन अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेले आहे. सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास करणारी ही यात्रा खंडाळा या ठिकाणी कार्यक्रम घेत पुढे २६ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे पोहोचणार आहे.
असाही सहभाग...
किसनवीर महाविद्यालय, वाईचे एनसीसी विभागातील प्रशिक्षक लेफ्टनंट समीर पवार यांच्यासह विद्यार्थी स्वस्थ भारत यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. हे सर्वजण सायकल चालवून ही यात्रा करणार आहेत. त्यामुळे देशातील जनतेला ‘ईट राईट इंडिया’चा नारा देत स्वस्थ राहण्याची प्रेरणा देण्यात किसनवीर महाविद्यालयाचा सहभाग वाखाणण्याजोगा आहे.
'Rite Right India' slogan | पाचवडमध्ये घुमला ‘ईट राईट इंडिया’चा नारा

Post a Comment

 
Top