0
माळीवाडा रस्त्यावर अपघात भरधाव कार कंटेनरवर आदळून दोघांचा मृत्यू

  • दौलताबाद : औरंगाबाद-नाशिक महामार्गावर बुधवारी (१९ डिसेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास भरधाव कार कंटेनरवर आदळल्यामुळे भीषण अपघात झाला. यात कारचा अक्षरश: चुराडा होऊन चालकासह एकाचा जागीच मृत्यू झाला. पराग रामचंद्र कुलकर्णी (३२, ह. मु. तारांगण कासलीवाल, पडेगाव, मूळ रा. पंचवटी, नाशिक) असे एका मृताचे नाव आहे. तर वृत्त देईपर्यंत अन्य एकाची ओळख पटली नव्हती. दरम्यान, तू वाट पाहू नको. मी नाशिकहून निघालोय, पहाटे तीनपर्यंत घरी पोहोचतो असे पराग यांनी फोनवर पत्नीला सांगितले होते. मात्र ही पहाट उजाडलीच नाही. थेट अपघात झाल्याचा फोन परागच्या कुटुंबीयांना आला. हा अपघात इतका भीषण होता की कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना गॅस कटर मागवावे लागले. कारचा पत्रा कापून पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला असून त्या चालकाचा शोध सुरू असल्याचे दौलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक सराफ यांनी सांगितले.

    मूळचे नाशिकमधील पराग बजाज फायनान्स कंपनीत वसुली प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. तीन ते चार वर्षांपूर्वी त्यांची जळगावहून औरंगाबादेत बदली झाली होती. तेव्हापासून ते पडेगावात राहत होते. बुधवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ते कारने (एमएच २३ एडी १६५४) नाशिक रोडवरून पडेगावच्या दिशेने येत होते. तर औरंगाबादहून निघालेला कंटेनर (एनएल १० एसी ०६०५) नाशिकच्या दिशेने जात होता. पहाटे ही दोन्ही वाहने माळीवाडा परिसरातील केडीआर फार्मजवळ येताच त्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. कंटेनरखाली शिरल्याने कारचा अक्षरश: चुराडा झाला. धडकेनंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
    नागरिक व रस्त्यावरील वाहनचालकांनी अपघाताची माहिती दौलताबाद पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक विवेक सराफ, वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनिरीक्षक विक्रम वडणे करत आहे. हवालदार अण्णा खजिनदार , सहायक फौजदार महंमद रफिक, ज्ञानेश्वर साळवे, सचिन त्रिभुवन घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या साहाय्याने कार रस्त्याच्या कडेला घेतली. यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. अथक प्रयत्न करूनही जखमींना बाहेर काढता आले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी व कटरने पत्रा कापून दोघांना बाहेर काढून त्यांचे मित्र सुनील गायकवाड व सतीश भिंगारे यांच्या मदतीने घाटीत दाखल केले असता डाॅक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दौलताबाद पोलिसांनी कंटेनरचालकावर गुन्हा नोंदवला आहे. उपनिरीक्षक व्ही. डी. वडणे, जमादार व्ही. एस. शिंदे तपास करत आहेत.Accident on Nashik Aurangabad Highway

Post a Comment

 
Top