0
वसतिगृह प्रशासनाने पोलिसांशी संपर्क न साधता आकांक्षाचा मृतदेह हलवल्यामुळे अनेक पुरावे झाले नष्ट

औरंगाबाद- डॉ. आकांक्षा देशमुख हिच्या खून प्रकरणात चौथ्या दिवशी शनिवारी ५० पेक्षा जास्त जणांचे जवाब नोंदवण्यात आले. सिडको पोलिसांचे पथक एमजीएम वसतिगृहाची बारकाईने तपासणी करत आहे. गंगा वसतिगृहात तिचा मृतदेह आढळला होता तेथील छत सीसीटीव्हीत दिसत नाही. शिवाय छतावरील एक पत्राही तुटलेला आहे. येथून एक व्यक्ती सहज बाजूच्या गच्चीवरून ये-जा करू शकतो. पोलिसांनी तसा डेमोही करून पाहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एमजीएम वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय आकांक्षाचा ११ डिसेंबर रोजी गळा दाबून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेला चार दिवस होऊनही पोलिसांना ठोस पुरावे न मिळाल्याने तपासाची दिशा ठरू शकलेली नाही. १५ डिसेंबर रोजी सहायक पोलिस आयुक्त अनिता जमादार यांनी सात ते आठ तास वसतिगृहात तळ ठोकून विद्यार्थिनी आणि वसतिगृह अधीक्षकांची चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृह प्रशासनाने पोलिसांशी संपर्क न साधता आकांक्षाचा मृतदेह हलवल्यामुळे अनेक पुरावे नष्ट झाले आहेत. तसेच आकांक्षा मृतावस्थेत तिच्या खोलीत १५ ते १८ तास पडून होती तरी वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना हे कसे समजले नाही याचा तपास सुरू आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी १० वाजता सहायक पोलिस आयुक्त अनिता जमादार, सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक पूनम पाटील, सायबर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक हेमंत तोडकर, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार नरसिंग पवार, राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, सुरेश भिसे, निंभोरे, संतोष मुदीराज, इरफान खान आदींनी वसतिगृहाची पाहणी करून मुलींचे जबाब नोंदवून घेतले.

खुनाच्या दिशेने तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास खुनाच्या दिशेने सुरू केला आहे. सुरक्षा रक्षक, वाॅर्डन, कामगार, बाजूला सुरू असलेल्या इमारतीवरील बांधकाम मजुरांची माहिती घेण्यात येत आहे. वसतिगृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. मात्र, त्यातून एकही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. मुलींच्या खोल्यांसमोर सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे खोलीत दोन दिवसांत कोण आले हे मात्र कळू शकले नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार जर हा खून असेल तर मारेकऱ्यांनी इमारतीची रेकी केली असावी. गच्चीवरील भाग सीसीटीव्हीत येत नाही याची त्याला माहिती असावी. त्यामुळे मारेकऱ्याचा हेतू फक्त खून करण्याचाच असावा. कारण खोलीतील एकही वस्तू चोरीला गेली नाही. आकांक्षाचा मोबाइल तेथेच पडून होता. शिवाय तिचा स्वभाव कसा होता, तिचे मित्र आणि नातेवाईक कोण आहेत, तिचा खून करण्यामागे काही कारण आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.
Aanaksha murder case in MGM, Aurangabad

Post a comment

 
Top