0
गुटखा बंदी असतानाही कर्नाटकातून गुटख्याचा साठा पुण्याला घेऊन निघालेल्या तवेराला कराडच्या कोल्हापूर नाक्यावर अपघात झाला. अपघातग्रस्त गाडीतून तब्बल 2 लाख 70 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. जप्त गुटख्याचा साठा साताऱयाकडे नेत असतानाच शिवडे (ता. कराड) जवळ अन्न व सुरक्षा अधिकाऱयांना गाडीतून ढकलून देत संशयितांनी गुटख्याच्या स्कॉर्पिओसह पुण्याकडे पलायन केले. याप्रकरणी उंब्रज पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी राजेंद्र रघुनाथ काकडे (वय 49 रा. सदरबजार सातारा) यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गुटख्याची तस्करी कर्नाटकातून
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ओमप्रकाश बिष्णोई हा पुणे परिसरात फिरून चोरून गुटख्याचे वितरण करत असतो. बेळगाव जिल्हय़ातील निपाणी शहरातून गुटख्याचा साठा खरेदी केला जातो. रविवारी 2 लाख 70 हजारांचा गुटखा खरेदी करून तो तवेरा कारमधून पुण्याला नेला जात होता. बिष्णोई याच्या मालकीच्या तवेरा कारचे दोन चालक हा गुटख्याचा साठा पुण्याकडे नेत होते. रात्री 12 वाजता कराडच्या कोल्हापूर नाका हद्दीत आल्यावर महामार्गावर पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संतोष चौधरी यांच्यासह पोलीस वाहनांची तपासणी करत होते.
वाहनाला अपघात, गुटखा जप्त
पोलीस दिसताच गुटख्याचा साठा असलेल्या वाहनावरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे तवेरा कार भरधाव वेगाने जाऊन दुभाजकाला धडकली. पोलीस तात्काळ अपघातग्रस्त वाहनाकडे धावले. त्यांनी तवेरात पुढे बसलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यांना कोणतीही जखम झालेली नव्हती. तवेरा गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 120 पोती भरलेली असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांनी गाडीतील मालाची तपासणी करण्यास सांगितले. गाडीतील पोती फोडून पाहिल्यावर त्यामध्ये विमल पान मसाला व व्ही वन गुटख्याने भरलेली पोती असल्याचे उघड झाले. याबाबत पोलिसांनी चालकांकडे चौकशी केल्यावर त्याने ओमप्रकाश बिष्णोई यांचे नाव सांगितले. गुटख्यासह गाडी ताब्यात घेण्यात आली. या प्रकाराची माहिती अन्न व सुरक्षा विभागास देण्यात आली.
अन्न सुरक्षा अधिकाऱयांची कराडात धाव
कराड पोलिसांनी 2 लाख 70 हजारांचा गुटखा पकडल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱयांना कळवले. अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र रघुनाथ काकडे, राहूल महादेव खंडागळे, नमुना सहाय्यक सुनील राघू सर्वगोड हे तिघेजण कराडला रवाना झाले. कराड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी गुटखा पकडलेल्या घटनेचा रिपोर्ट देत गुटख्याच्या गाडीचा मालक ओमप्रकाश विरमाराम बिशनोई (वय 28) याच्यासह अन्य दोघांना अन्न सुरक्षा अधिकाऱयांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या गुटख्याचा पंचनामा अधिकाऱयांनी पंचनामा केला. 2 लाख 70 हजारांची गुटख्याच्या गोण्या स्कॉर्पिओ गाडीत भरून संशयितांसह पुढच्या कारवाईसाठी सर्वजण साताऱयाकडे रवाना झाले.
अधिकाऱयांना ढकलून संशयित पसार
सोमवारी दुपारी तासवडे टोलनाका पास करून शिवडे गावच्या हद्दीत सर्वजण श्री गणेश हॉटेल येथे जेवणासाठी थांबले. जेवण करण्यासाठी सर्वजण हॉटेलमध्ये गेले. जेवण झाल्यावर स्कॉर्पिओ मालक संशयित ओमप्रकाश बिष्णोई व त्याचे दोन साथीदार यांच्यासह स्कॉर्पिओमध्ये बसण्यासाठी गेले. नमुना सहाय्यक सुनील सर्वगोड व राजेंद्र काकडे हे गाडीत बसत असतानाच स्कॉर्पिओ चालकाने वेगाने गाडी मागे घेत त्याच्या शेजारी बसलेल्या अन्य एकाने सर्वगोड व काकडे यांना धक्का देऊन खाली पाडले. स्कॉर्पिओ पुन्हा वेगाने पुढे आणत असतानाच सर्वगोड गाडीच्या आडवे गेले मात्र संशयितांनी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याने ते बाजूला झाले. अधिकाऱयांना ढकलून देऊन संशयितांनी गुटख्याने भरलेली स्कॉर्पिओ घेऊन पुण्याच्या दिशेने पलायन केले. नमुना सहाय्यक सर्वगोड यांची कागदपत्रांची बॅगही स्कॉर्पिओमध्ये होती. यानंतर अधिकाऱयांनी त्यांच्याकडील दुसऱया स्विफ्ट कारने उंब्रज पोलीस ठाणे गाठले. हा प्रकार समोर आल्यावर खळबळ उडाली. पोलिसांनी महामार्गावर नाकाबंदी केली मात्र संशयितांचा पत्ता लागला नाही.

Post a Comment

 
Top