0
25 वर्षांपासून राज्यात सत्ता परिवर्तनाची परंपरा...

जयपूर - राजस्थान विधानसभा निवडणुकीत 199 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीला बॅलेट पेपरवरून झालेल्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली. यानंतर ईव्हीएमचे निकाल समोर येत आहेत. राजस्थानात गेल्या 25 वर्षांपासून काँग्रेस आणि भाजपला सत्ता आलटून-पालटून मिळत आली आहे. दर 5 वर्षाला येथे सत्ता बदल अटळ आहे. परंतु, 2013 मध्ये मुख्यमंत्री झालेल्या भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे ही परंपरा मोडीत काढणार का याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी सचिन पायलट आणि माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत.

मतमोजणीत हे पक्ष आघाडीवर

काँग्रेस 100
भाजप 76
इतर 22
काँग्रेसची जोरदार मुसंडी...

टोंक येथून सचिन पायलट आणि झालरापटन येथून वसुंधरा राजे हे दोघेही आघाडीवर आहेत. सोबतच, सरदारपुरा येथून माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत सुद्धा पुढारीवर आहेत. अशात भाजप आणि वसुंधरा यांचे सत्ता कायम ठेवण्याचे स्वप्न भंगणार असे चित्र दिसून येत आहे. राजस्थान काँग्रेस मुख्यालयात या निकालांच्या कलांवरून मिठाई वाटप आणि आतषबाजीची तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपच्या मुख्यालयावर मात्र शुकशुकाट पसरला आहे.

काय म्हणाले सचिन पायलट?

निवडणुकीचे कल समोर येत असतानाच काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे संभावित उमेदवार सचिन पायलट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मतमोजणीच्या सुरुवातीला समोर येणारे कल हा राजस्थानसह देशभर भाजपच्या धोरणांचे अपयश आणि काँग्रेसच्या संघर्षाचा विजय आहे. राज्यात काँग्रेस स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असून मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे पायलट यांनी सांगितले आहे.

25 वर्षांपासून सत्ता परिवर्तनाची परंपरा
1993 : भाजपने 38.60% मतांसह 95 जागा जिंकून सत्ता स्थापित केली. काँग्रेसला 76 जागा मिळाल्या होत्या.
1998 : काँग्रेसने 44.95% मतांसह तब्बल 153 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता घेतली.
2003 : भाजपने 39.20% मतांसह काँग्रेसला सत्तेतून बाहेर केले. भाजपला यात 120 आणि काँग्रेसला फक्त 56 जागा मिळाल्या होत्या.
2008 : काँग्रेसने 36.82% मते मिळवून 96 जागा जिंकल्या आणि सत्ता स्थापित केली. भाजपला 78 जागा मिळाल्या होत्या.
2013 : मोदी लाटेत भाजपने 46.05% मतांसह 163 जागा मिळवल्या आणि काँग्रेसला फक्त 21 जागाच मिळाल्या.

66 वर्षांत 14 निवडणुका, 13 मुख्यमंत्री
राजस्थानात गेल्या 66 वर्षांमध्ये 14 विधानसभा निवडणुका झाल्या. यात सर्वाधिक 4 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मोहन लाल सुखाडिया यांच्याकडे राहिला. भैरवसिंह शेखावत तीनदा राजस्थानचे मुख्यमंत्री होते. सुखाडिया यांनी जवळपास 16 वर्षे 5 महिने आणि शेखावत यांनी 10 वर्षे 4 महिने सीएम पद सांभाळले आहे.Rajasthan Assembly Election Results Live News And Updates

Post a comment

 
Top