0
विद्यापीठात कौशल्य विकास, क्रीडा, औषध, वस्त्रोद्योग, कृषी, पशुसंवर्धन, विकास आदी अभ्यासक्रमांचा समावेश होईल.

मुंबई- राज्यातील स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ स्थापन करण्याच्या मार्गदर्शक सूचनांत सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता या विद्यापीठात कौशल्य विकास, क्रीडा, औषध, वस्त्रोद्योग, कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य संवर्धन विकास आदी अभ्यासक्रमांचा समावेश होईल. यासाठी विद्यापीठांना मान्यता देण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

आगामी काही वर्षांत नोकरीची जास्त संधी असलेल्या क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकवणारी कौशल्य विकास विद्यापीठे राज्य सरकार स्थापन करणार असल्याची बातमी 'दिव्य मराठी'नेच सर्वप्रथम दिली होती. तावडे म्हणाले, स्वयंअर्थसाहाय्यित विद्यापीठ स्थापनेसंदर्भात बोंगीरवार समितीच्या अहवालातील शिफारसी शासनाने मान्य केल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठांत नोकरीच्या संधी देणारे कृषी, पशुविकास, औषधे, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), लिटिगेशन तयार करण्याचे अभ्यासक्रम सुरू केले जातील. यासाठी संबंधित विभागाबरोबर चर्चा करून नोकरीसाठी कोणते अभ्यासक्रम आवश्यक आहेत, ते पाहून परवानगी दिली जाईल. या विद्यापीठासाठी स्वतंत्र नियामक मंडळ असेल.

एमएमआरडीएच्या क्षेत्रात १० एकर, पुणे, नाशिक, नागपूर या प्रादेशिक प्राधिकरणात १० एकर, विभागीय मुख्यालय क्षेत्रात १० एकर व ग्रामीणमध्ये २५ एकर इतक्या आवश्यक जमिनीचा निकष यासाठी ठरवला आहे. या विद्यापीठांत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांसाठी शुल्क ठरविण्यासाठी शुल्क निश्चिती समिती स्थापन केली जाईल. यात माजी कुलगुरू, सनदी लेखापाल, पद्मभूषण प्राप्त सदस्यांचा समावेश असेल, असेही तावडे म्हणाले. ऑनलाइन विद्यापीठ सुरू करण्याबाबत केलेली मागणीही सरकारने मान्य केली असून ऑनलाइन पदवीही आता ग्राह्य धरली जाईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.

अकृषी विद्यापीठांना अधिष्ठाते पदांसाठी परवानगी :
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुदीनुसार अकृषी विद्यापीठांसाठी विद्याशाखा अधिष्ठाता या पदांना मान्यता मिळाली आहे. ५ विद्यापीठांत प्रत्येकी ४ याप्रमाणे २० अधिष्ठाता पदांना व इतर ६ अकृषी विद्यापीठांना २ याप्रमाणे १२ अधिष्ठाता पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांत ३२ विद्याशाखा अधिष्ठाता पदांना मान्यता दिलेली असून उर्वरित १२ अधिष्ठाता पदांना मंत्रिमंडळाने तत्त्वत:: मान्यता दिली आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

मुंबईत होणार डॉ. होमी भाभा विद्यापीठ
तावडे म्हणाले, उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व मुंबई विद्यापीठावरील ताण कमी करण्यासाठी ४ महाविद्यालयांना एकत्रित करून डॉ. होमी भाभा विद्यापीठाची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. मोठ्या संख्येने संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमुळे शैक्षणिक मूल्यांकन व आवश्यक भौतिक सुविधांची तपासणी करणे विद्यापीठांना कठीण जात आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील ३ ते ५ महाविद्यालये एकत्र केल्याने िद्याशाखांचा संगम होऊन समूह विद्यापीठाची स्थापना केल्यास उपलब्ध मनुष्यबळ व अन्य सुविधांचा अधिकाधिक वापर होऊ शकले. यूजीसी नियमाप्रमाणे ३.५ ग्रेड व ए मानांकीत महाविद्यालये एकत्र आली तर त्यांना क्लस्टर विद्यापीठ म्हणून मान्यता दिली जाईल. मुंबईत असे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रूसा २.० अंतर्गत प्रस्तावास मंजुरी दिली. यानुसार शासकीय विज्ञान संस्थेसह सिडनेहॅम कॉलेज, एल्फिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय यांचा समावेश असलेले डॉ. होमी भाभा विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या विद्यापीठासाठी आवश्यक पदनिर्मितीसह आवर्ती व अनावर्ती खर्चासही मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Establishment of Skills Development University in the State; Sudhir Mungativar

Post a Comment

 
Top