0
अन्याय खासदार पाटील यांच्या उपस्थितीत दत्तक गाव लोहटारला घडला प्रकार

पाचोरा- तालुक्यातील लाेहटार येथे शनिवारी (ता. २९ राेजी) स्वत:च्या जमिनीवर सभामंडप व जिर्णाेद्धारास विराेध करून शेतकरी दाम्पत्याने खासदार ए. टी. पाटील यांच्यासमाेर पेट्राेल प्राशन करून अंगावर अाेतले. स्वत:ला पेटवून घेत असतानाच ग्रामस्थ व नातेवाईकांनी अडवल्याने अनर्थ टळला. त्यांच्यावर प्राथमिक आराेग्य केंद्रात प्रथमाेचार करून जळगाव येथे हलवण्यात अाले. शेतकऱ्याच्या विराेधाला न जुमानता भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला.

लाेहटार गाव खासदार ए. टी. पाटील यांनी दत्तक घेतले असून या गावी आदर्श संसद व पर्यटन विकास योजनेतून १ कोटी ३९ लाख रुपये निधी खर्च करून २९ रोजी चतुर्भुज नारायण मंदिर परिसर सुशोभीकरण व सभागृहाच्या उद्घाटनासाठी खासदार ए. टी. पाटील व भाजपचे पदाधिकारी अाले हाेते. भारत शंकर पाटील (राजपूत) यांच्या स्वमालकीच्या गट नं. २५२ मध्ये मंदिराचे सुशोभीकरण व सभामंडपाचे उद्घाटन करण्यात येणार होते. दरम्यान भारत पाटील गेल्या २-३ महिन्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री व अधिकाऱ्यांना लेखी निवेदने पाठवून उदरनिर्वाहासाठी केवळ ४ एकर जमीन असल्याने या जमिनीवर मंदिराचे सुशोभीकरण व सभामंडप बांधण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. दरम्यान भारत पाटील व भाजप तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासोबत काम न होण्यासाठी २-३ वेळा बैठकही झाली. मात्र सुभाष पाटील यांनी त्यांचे काहीही म्हणणे न एेकता २९ रोजी कामाचे भूमिपूजन करण्याचा ठाम निर्णय घेतला अशी माहिती भारत पाटील यांचे भाऊ ज्ञानेश्वर शंकर पाटील यांनी दिली.

अखेर २९ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान खासदार ए. टी. पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, जिल्हा परिषद सदस्य मधुकर पाटील, डी. एम. पाटील, सरचिटणीस प्रदीप पाटील, नंदू सोमवंशी गट नं २५२ मध्ये भूमिपूजनासाठी आल्यानंतर भारत पाटील व आरती पाटील यांनी त्यांना भूमिपूजन न करण्यासाठी विनंती केली. मात्र भूमिपूजन होणे थांबत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पती-पत्नीने पेट्रोल प्राशन करून अंगावर ओतले व स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी भूमिपूजन करणाऱ्यांनी त्यांच्याकडे लक्ष न देता टाळ्या वाजवून भूमिपूजन पार पाडले. तर दुसरीकडे ज्ञानेश्वर शंकर पाटील व नातेवाईकांसह गावातील लोकांनी पती पत्नीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या वेळी वाहनातून खाली उतरवत असताना भारत पाटील हे दवाखान्याच्या बाहेरच भुरळ येऊन पडले तर पत्नी आरती पाटील यांनी पोलिस ठाण्यात धावत जाऊन आमची तक्रार दाखल करा अशी विनंती केली. पोलिस प्रशासनातर्फे तातडीने हवालदार हंसराज मोरे तर महसूल प्रशासनातर्फे निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे यांनी पाटील त्यांचा जबाब नोंदविला.

गावकऱ्यांनी अडवल्याने अनर्थ टळला
शेतकरी दाम्पत्याने पेट्रोल सेवन करून अंगावर ओतल्यानंतर स्वतःला पेटवून घेत असतानाच गावकरी व नातेवाईकांनी त्यांना अडवल्याने अनर्थ टळला. भारत पाटील व आरती पाटील यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ अतुल महाजन व डॉ पंकज नानकर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक केशव पातोंड, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौबे, पंकज शिंदे, दत्तात्रय नलावडे व निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे यांनी पीडितांच्या जबाब नोंदविला.Suicide attempt in Pachora, Jalgoan

Post a Comment

 
Top