0

कार्यकर्ते उड्डाणपुलाच्या पायथ्याशी अगोदरपासूनच टोमॅटोचे गाठोडे बांधून उभे होते.

परभणी- जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना लागू करून शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, शेतमालाला भाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी(दि.२६) कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कारवर टोमॅटो फेकून निषेध नोंदवला.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ आटोपून कृषी राज्यमंत्री खोत हे पाथरी येथील शेतकरी मेळाव्यासाठी जात होते. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या वाहनांचा ताफा शहरातून बाहेर पडून उड्डाणपुलाकडे जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, केशव आरमळ, दिगंबर पवार, मुंजाभाऊ लोंढे, उस्मान पठाण आदी कार्यकर्त्यांनी वाहनांच्या ताफ्यावर टोमॅटो भिरकावले. हे कार्यकर्ते उड्डाणपुलाच्या पायथ्याशी अगोदरपासूनच टोमॅटोचे गाठोडे बांधून उभे होते. पोलिसांच्या गाड्या पुढे सरकल्यावर कार्यकर्त्यांनी टोमॅटो भिरकावण्यास सुरुवात केली. मात्र गाड्यांचा ताफा त्याच वेगाने पुढे सरकला.

दरम्यान, संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी कृषी राज्यमंत्र्यांना घेराव घालण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले होते. परंतु ऐनवेळी टोमॅटो फेकून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले असून त्यात प्रामुख्याने जिल्ह्यात दुष्काळ असताना डिग्रस बंधाऱ्याचे पाणी नांदेडला का सोडले गेले, याचा जाब विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर लोअर दुधना प्रकल्पातून दुधना नदीपात्रात पाणी सोडावे तर डिग्रस बंधाऱ्यात नाथसागराचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. जनावरांना दावणीला चारा उपलब्ध करून देण्यात यावा, मागील खरिपाचा पीक विमा व या वर्षीचा खरिपाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.

People get angry on Sadabhau Khot

Post a Comment

 
Top