0

नाना चुडासामा यांच्या निधनाने मुंबईच्या सामाजिक-सांस्कृतिक विकासाचा ध्यास असणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे

मुंबई- मुंबईचे माजी नगरपाल, ज्येष्ठ समाजसेवक, जायंट इंटरनॅशनल आणि 'मुंबई माझी लाडकी' संस्थेचे संस्थापक, 'पद्मश्री' नाना चुडासामा यांचे रविवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. सकाळी चर्चगेट येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 86 वर्षांचे होते. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पार्थिवावर शांती बंगला नंबर 2, वाळकेश्वर, नारायण दाभोलकर रोड, नेपियेंसी रोडच्या बाजुला अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत. नाना चुडासामा हे भाजप नेत्या आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एनसी यांचे वडील होत.

मुंबईच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनाशी एकरुप झालेले व्यक्तिमत्त्व हरपले- मुख्यमंत्री
मुंबईचे माजी नगरपाल आणि जायंटस् इंटरनॅशनल या जागतिक स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक नाना चुडासामा यांच्या निधनाने मुंबईच्या सामाजिक-सांस्कृतिक विकासाचा ध्यास असणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.


मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, नाना चुडासामा हे मुंबईच्या समाजजीवनाशी खऱ्या अर्थाने एकरूप झाले होते. विविध संस्था, संघटना आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी या महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. विशेषतः मुंबईच्या नगरपालपदाला त्यांनी कृतीशीलतेचा आयाम दिला. जायंटस इंटरनॅशनलसारख्या संस्थेच्या रुपाने समाजसेवेसाठी एक व्यापक व्यासपीठ उभारण्यासाठी केलेली धडपड त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचीती देणारी होती. देशातील विविध चर्चित विषयांवर दोन ओळींमध्ये नियमित आणि मार्मिक भाष्य करणारे नानांचे मरिन ड्राइव्ह येथील बॅनर हे त्यांच्यातील परखड भाष्यकाराची प्रचीती देणारे होते.

'दक्ष मुंबईकर' गमावला- राज्यपाल

नाना चुडासामा यांच्या रुपाने आपण मुंबईच्या विकासाची तळमळ असलेला 'दक्ष मुंबईकर' गमावल्याची भावना राज्यपाल सी. विद्यासागर यांनी व्यक्त केली आहे. चुडासामा यांनी मुंबईच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले होते. 'हरित मुंबई आणि स्वच्छ मुंबई'साठी योगदान देताना त्यांनी 'आय लव्ह मुंबई' या मोहिमेच्या माध्यमातून वृक्षरोपणाचेही काम केले होते.
Former Nagarpar of Mumbai Nana Chudasama Passes Away

Post a Comment

 
Top