0

राजकारण : राष्ट्रवादी, भाजप किंवा भाजपचा गट एकत्र आणण्याचा प्रयत्न

नगर - सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेनेने केला आहे. महापौरपदासाठी फिल्डिंगही लावण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीदेखील सत्ता स्थापन करण्यासाठी चाचपणी करत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार की, शिवसेनेबरोबर राहणार हा आैत्सुक्याचा विषय बनला आहे.

मनपा निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वबळावरच रिंगणात उतरले. प्रचाराच्या तोफा दोन्ही पक्षांनी एकमेकांवर रोखून आरोपांचा भडीमार केला. निवडणुकीत शिवसेना २४, राष्ट्रवादी १८, भाजप १४, काँग्रेस ५, बसप ४, सपा १ व २ अपक्ष निवडून आले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता ३५ नगरसेवकांचा आकडा जुळवणारा पक्ष सत्तेवर येणार आहे. हा आकडा भाजप व शिवसेनेची युती झाल्यास सहज गाठता येईल. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर युतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याने फोडाफोडीचे राजकारण होण्याची चिन्ह आहेत.भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे चांगलेच सक्रीय झाले होते. त्यांनी खेळी केली, तर गणिते बदलू शकतात. शिवसेनेला बाजूला ठेवून राजकीय समीकरण जुळवताना भाजप किंवा भाजपचा एक मोठा गट राष्ट्रवादीबरोबर आल्यास सत्ता स्थापन होऊ शकते, असा अंदाज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजप व शिवसेना युती करून सामोरे जाणार असतील, तर मनपात भाजप शिवसेनेला डावलणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

शिवसेनेची उद्या गटनोंदणी 
शिवसेनेच्या २४ नगरसेवकांची गटनोंदणी मंगळवारी (१८ डिसेंबर) होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा गटनेता कोण असेल याबाबत सध्यातरी गोपनीयता पाळली जात आहे. पण महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. स्वच्छ, तरुण चेहऱ्यालाच शिवसेना संधी देणार असल्याने इच्छुक नगरसेवकांनी महापौरपदासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

राष्ट्रवादीकडून आकडेवारीचे समीकरण 
राष्ट्रवादी १८, काँग्रेस ५, भाजप १४ एकत्र आल्यास ३७ संख्याबळ होऊन सत्ता स्थापन करता येईल. किंवा राष्ट्रवादी काँग्रेस १८, भाजपच्या ८ नगरसेवकांचा एक गट, ५ काँग्रेस, ४ बसप, १ सपा, १ अपक्ष असे समीकरण जुळवले, तरी संख्याबळ ३७ पर्यंत पोहोचू शकते. सर्व शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसकडून तपासून पाहिल्या जात आहेत. 

Post a Comment

 
Top