परळी खोऱयात भात काढण्यास जोरदार सुरुवात झाली आहे. भात काढून झाल्यावर लगेचच भात झोडून भाताची पोती भरून ती घरपोच केली जातात. यावर्षी झालेल्या परळी खोऱयातील मोठय़ा प्रमाणात पावसाच्या माऱयामुळे भाताच्या उत्पन्नात गतवर्षीपेक्षा घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
परळीसह शेजारील कुस, बनघर, खडगाव, कासरथळ, निगुडमाळ, नित्रळ या ठिकाणी सध्या भाताची सुगी सुरू झाली आहे. भात कापणी व झोडपणीच्या कामात शेतकरी गढून गेल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. या भागात जमिनी लाल मातीच्या व मुरबाड असल्याने येथील शेतकरी भात, नाचणी, वरी ही पिके घेतात. या परिसरात हळव, इंद्रायणी व महान या प्रजातींचा भात होतो. हळव भाताची काढणी दसऱयाला पूर्ण झाली. महान भाताची कापणी व झोडणी सुरू आहे. यात इंद्रायणी, सोन पनवेल, कोळंबा, कोलम, सोनम ही पिके घेतली जातात. भाताची कापणी करून त्याच्या पेंडय़ा बांधून लोखंडी कॉट अथवा बॅरलवर झोडणारे शेतकरी असे चित्र गावोगावी दिसत आहे.

Post a Comment