0
कटरने टेम्पोचा पत्रा कापून जखमी पती-पत्नी व त्यांच्या मुलांना बाहेर काढले.

मोहोळ- मोहोळ-टेंभुर्णी महामार्गावर मोहोळपासून एक किलोमीटर अंतरावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रकवर आयशर टेम्पो येऊन धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातामध्ये आयशर टेम्पो चालक जागीच ठार झाला तर टेम्पोतील पती-पत्नी जखमी झाले. सुदैवाने या अपघातामध्ये टेम्पोतील लहान दोन चिमुकल्या मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही. एनडीआरएफ जवानांच्या व मोहोळ पोलिस पथकाच्या अथक परिश्रमांमुळे जखमींना तात्काळ मदत मिळाली व त्यांचे प्राण वाचले. अपघात गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारात माळी वस्ती समोरील पुलावर झाला. अली महंमद शेख असे मृतकाचे नाव आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच.-10 झेड 3213 हा ट्रक नादुरुस्त झाल्याने मोहोळ-टेंभुर्णी महामार्गावरील माळी वस्ती जवळील उड्डाणपुलावर रस्त्याच्या एका लेनमध्ये थांबला होता. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेला एमएच-46 एआर 6514 हा आयशर टेम्पो ट्रकला पाठीमागून येऊन जोरदार धडकला. त्यामध्ये टेम्पो चालक अली मोहम्मद शेख (रा.इटकळ, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) हा जागीच ठार झाला. टेम्पोमध्ये बसलेले चांद बाबुलाल नदाफ व त्यांची पत्नी फर्जाना (रा.लोहगाव, ता.तुळजापूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यासोबत असलेले त्यांची दोन लहान मुले हे मात्र या अपघातातून सुदैवाने बचावली. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
अपघात माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश शिंदे, घाडगे आदी त्या ठिकाणी मदत कार्यासाठी धावून गेले. मात्र अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये अडकलेल्या जखमींना व मृत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यादरम्यान पुणे येथील राष्ट्रीय आपदा मोचन बल 05 वाहिनी सुंझुबरे हे सोलापूर येथील कार्यक्रम आटपून परत पुण्याकडे निघाले होते.
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बिपीन बिहारी सिंह यांच्यासह त्यांच्या 22 कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या सोबत असलेल्या कटर साहित्य व इतर साहित्याने आयशर टेम्पोचा पत्रा कापून जखमी पती-पत्नी व त्यांच्या मुलांना बाहेर काढले तसेच मृत चालक आली मोहम्मद यालाही बाहेर काढले. एन.डी.आर.एफ.च्या जवानांमुळे व मोहोळ पोलिस पथकाच्या सहकार्यामुळे जखमींना तात्काळ मदत मिळाली. या अपघात प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अविनाश शिंदे करत आहेत.
Tempo Drive Death in Accident on Mohol Tembhurni highway

Post a comment

 
Top