0
अनुस्कुरा (ता. शाहूवाडी) परिसरात धुमाकूळ घातलेल्या टस्करने पुन्हा आपला मोर्चा शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्यात वळविला आहे. सोमवारी रात्री वाशी परिसरात आलेल्या  टस्करने  ऊस पिकांचे नुकसान केले. तर नळपाणी योजनेची पाण्याची टाकी उद्ध्वस्त केली. बावीस दिवसांनी जांभळी खोऱयात परतलेल्या टस्करने पुन्हा एकदा दहशत माजविण्यास प्रारंभ केला असून परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.
           सोमवारी रात्री अणुस्करा परिसरातून  टस्करचा  परतीचा प्रवास सुरू झाला. कासारी नदी पार करून बर्की, बुराणवाडी, इजोली मार्गे जांभळी खोऱयातील वाशीच्या हद्दीत आगमन झाले. येथील बबन लखू खापणे यांच्या शेतावर रात्री साडेनऊच्या सुमारास येत शेतातील ऊस फस्त करून आपला मोर्चा वाशी गावाजवळून जात रात्री साडेअकराच्या सुमारास गणपती सुतार यांच्या दारात येत वाशी गावांस पिण्याचे पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी फोडली व मोठमोठय़ाने चित्कार करत दिनकर धर्मा पाटील यांच्या शेतात जावून ऊस फस्त करून नुकसान केले. रात्रभर टस्कर करत असलेल्या चित्कारमुळे वाशी ग्रामस्थ भयभयीत झाले होते. पहाटे पाचच्या सुमारास त्याने भुत्या नावाच्या जंगलात आपला मोर्चा वळवला आहे.
    मानवाड परिमंडळच्या वनपाल स्मिता डाके यांच्या मार्गदर्शनाखाली  वनरक्षक आप्पासाहेब भुरटे, ए. जी मोरे, मनिषा देसाई, वन कर्मचारी हिंदुराव पाटील,  शंकर पोवार, शामराव जाधव, आकाराम पाटील यांनी टस्कर नुकसान केलेल्या पिकांचे व उद्ध्वस्त केलेल्या पाण्याच्या टाकीचा पंचनामा केला आहे. दरम्यान,  टस्करने परतीचा प्रवास सुरू केला असून पडसाळी, कोलिक,  मानवाड, पिसात्री परिसरातील शेतकऱयांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जावू नये, असे आवाहन वनविभागाकडून  केले आहे.

Post a Comment

 
Top