सावगाव धरणामध्ये पोहावयास गेलेल्या चार वर्गमित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. बुधवार दि. 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या या घटनेमुळे बेळगावकारांना धक्का बसला होता. त्यामुळे यापुढे असे प्रकारे घडून जिवीतहानी होऊ नये या उद्देशाने कृष्णचैतन्य फौंडेशनतर्फे रविवारी दुपारी धरणाच्या परिसरात ‘धोक्याची सूचना’ देणारा फलक लावण्यात आला.
याच धरणात चैतन्य भांदुर्गे, साहिल बेनके, गौतम कलघटगी व अमन सिंग या गुडशेडफर्ड शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱया चौघा वर्गमित्रांचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. परिणामी यापुढे तरी अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने खबरदारी घेऊन धरण किंवा तलावांच्या ठिकाणी ‘धोक्याची सूचना’ देणारे फलक लावायला हवे होते. पण अद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चैतन्य भांदुर्गेचे वडील गजानंद भांदुर्गे यांनीच पुढाकार घेऊन रविवारी सावगाव धरणाजवळ ‘धोक्याची सूचना’ देणारा फलक लावून धरण परिसरात येणाऱया लोकांसाठी सावधानतेचा संदेश दिला आहे.
यावेळी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, स्वप्नील भडाळे, केदार मोहिते, महेश पाटील, बसवराज दिन्नीमनी, गजानंद भांदुर्गे, दीपक लाड, दीपक नार्वेकर आदी उपस्थित होते.

Post a comment