0

आरोग्य संचालकांना अहवाल देणार आज जिल्हा शल्यचिकित्सकांच्या उपस्थितीत बीडमध्ये बैठक 

  • Shocking News in Beedबीड- दहाव्या वेळी गरोदर असताना प्रसूतीनंतर अति-रक्तस्राव होऊन आईसह बाळाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची बीड जिल्हा शल्यचिकित्सकांनी गंभीर दखल घेतली आहे. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी त्या विवाहितेच्या प्रसूतीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरसह परिचारीकेस या प्रकरणाचे पेपर घेऊन चौकशीसाठी सोमवारी बीड येथे बोलावले आहे. या बैठकीतच महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्याचा अहवाल राज्याच्या आरोग्य संचालकांना पाठवला जाणार आहे.
    माजलगाव येथील विवाहिता मीरा रामेश्वर एखंडे (३५ ) ही दहाव्यांदा गरोदर होती. २८ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी दीड वाजता तिला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आल्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रसूतीच्या वेळी अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी तिला रक्त देऊनही रक्तस्राव थांबलाच नाही. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी अनिल परदेशी, डॉ. गजानन रुद्रवार व डॉ. राजेश रुद्रवार यांच्यासह परिचारिकांनी तीन तास परिश्रम घेऊनही विवाहिता व तिचे बाळ वाचू शकले नाही. या घटनेमुळे माजलगाव शहर हादरले. या प्रकरणी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .अशोक थोरात यांनी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी संध्याकाळी त्या महिलेच्या प्रसूतीच्या वेळी ड्युटीवर असलेले डॉ. गजानन रुद्रवार व परिचारिकेला महिलेचे केस पेपर घेऊन बीडला चौकशीसाठी बोलावले आहे. सदरील विवाहिता रुग्णालयात किती वाजता आली होती, ती किती वाजता प्रसूत झाली., प्रसूतीत नेमक्या काय अडचणी आल्या, बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची चौकशी केली जाणार आहे. माता मृत्यू प्रकरणी सोमवारीच बीड जिल्हा रुग्णालयात डॉ. थोरात हे बैठक घेणार असून या बैठकीस माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संजय कदम हेही उपस्थित राहणार आहेत. त्या विवाहितेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा निष्कर्ष काढून अहवाल आरोग्य संचालकांना पाठवला जाणार आहे.
    नऊ महिन्यांत नऊ मातांचा मृत्यू 
    बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा माता मृत्यूचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमीवर आले आहे. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात हेच प्रमाण २३ एवढे होते. त्यानंतर २०१७-१८ मध्ये हे प्रमाण १२ राहिले. २०१८-१९ या नऊ महिन्यांत जिल्ह्यात नऊ महिलांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा माता मृत्यू दर पाहिला तर हे प्रमाण ६१ आहे. महाराष्ट्रात एक लाख मुले जन्मली तर त्या पाठीमागे ६१ मातांचा मृत्यू होतो.
    प्रसूतीच्या वेळी महिलांच्या मृत्यूची कारणे 
    -गरोदरपणात रक्तदाब वाढून झटके येणे 
    -गरोदरपणात महिलांनी वेळेत आरोग्य तपासणी करावी
    -सिझरनंतर होणारे इन्फेक्शन
    -कमी तसेच जास्त वयात गर्भधारणा होणे. 

    गरोदर महिलांचे मृत्यू रोखण्यासाठीचे उपाय 
    -गरोदरपणात महिलांनी वेळेत आरोग्य तपासणी करावी 
    -जिथे रक्तपुरवठा उपलब्ध आहे अशा ठिकाणी प्रसूती करावी . 
    -वयाच्या १८ वर्षानंतर विवाह २० वर्षानंतर पहिले गरोदरपण हवे 
    -प्रसृतीच्या वेळी रक्तदाब वाढू नये म्हणून महिलांनी फॉलिक अॅसिड गोळ्या घ्याव्यात .
    महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल

    गरोदर महिलांची गर्भाशयाची पिशवी प्रसूतीच्या वेळी आकुंचन न पावल्याने अति रक्तस्राव होऊन महिलेचा मृत्यू होऊ ओढवतो. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी उशीर झाला का तसेच उपचाराला उशीर झाला का, मुलाचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याची चिकित्सा उद्याच्या बैठकीत होऊन मृत्यूचे नेमके कारणही स्पष्ट होईल . डॉ. संजय कदम, माता व बालसंगोपन अधिकारी
    डॉक्टरांच्या विरोधात तक्रार देणार 
    मीरा एखंडे यांच्या प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी निष्काळजीपणा केला आहे. प्रसूतीच्या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ नव्हते. दुपारी दीड वाजता प्रसूतीसाठी दाखल केले असताना संध्याकाळी सात वाजता टेबलावर ठेवले. ७ ते ९ पर्यंत डॉक्टरांनी काय उपचार केले याची माहिती नातेवाइकांना दिली नाही. आम्ही डॉक्टरांविरोधात तक्रार देणार आहोत. प्रशांत शेटे, मृत महिलेचा नातेवाइक

Post a Comment

 
Top