0
सुनावणी मिशेलने वकिलास विचारले होते, मिसेस गांधींबद्दल काय उत्तर देऊ?

नवी दिल्ली- सुमारे ३,६०० कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात शनिवारी 'मिसेस गांधी' आणि त्यांचे पुत्र 'आर' यांचे नाव जोडले गेले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी न्यायालयात याबाबत माहिती दिली. या व्यवहारातील दलाल ख्रिश्चियन मिशेल याने आपल्या वकिलास गुपचूप एक चिठ्ठी सोपवली आणि मिसेस गांधींबद्दल विचारलेल्या प्रश्नांवर काय उत्तरे देऊ, असे विचारले होते. शिवाय 'इटलीच्या एका महिलेचा पुत्र 'आर' पुढील पंतप्रधान असेल,' अशा आशयाचे पत्र मिशेलने ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला पाठवले होते, असे ईडीने न्यायालयात सांगितले. दरम्यान, ही दोन्ही संक्षिप्त नावे म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी संबंधित असल्याचे मानले जात आहे.

न्यायालयाने दलाल मिशेल याची कोठडी आणखी सात दिवस वाढवली आहे. तसेच वकिलाशी भेटण्याची मुभा असताना त्याचा गैरवापर केल्यामुळे या भेटीची वेळही न्यायालयाने निम्म्यावर आणली. आता एका वेळी तीन वकील सकाळी १० वाजता आणि सायंकाळी ५ वाजता केवळ १५ मिनिटांसाठी मिशेल यास भेटू शकतील.
मिशेलवर दबाव : काँग्रेसचा आरोप
भाजप सरकार ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याच्या तपासाचे निमित्त साधून आपल्या तपास संस्थांच्या मदतीने आरोपी ख्रिश्चियन मिशेलवर या घोटाळ्याच्या चौकशीत देशातील विशिष्ट कुटुंबाचे नाव घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.

भाजप काय करताे ते आम्ही पाहिले आहे...
या प्रकरणात भाजप काय करत आहे हे आम्ही पाहिले आहे. एका वाहिनीवर तर एका विशिष्ट कुटुंबाचे नाव घेण्यासाठी मिशेलवर कसा दबाव टाकला जात आहे, हे पण दाखवले, असे काँग्रेस नेते आर. पी. एन. सिंह म्हणाले. ईडीचे स्क्रिप्ट रायटर ओव्हरटाइम करत असल्याची टीका त्यांनी केली.
अनेकांची झोप उडाली, चोरांना चौकीदार त्यांची जागा दाखवेल : मोदी
जनतेचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून चौकीदार दिवस-रात्र कष्ट घेत आहे. तुम्ही आशीर्वाद द्या. कारण, चौकीदारामुळे अनेक चोरांची झोप उडाली आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझीपूर येथे सभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. शेतकरी कर्जमाफीसारख्या तात्पुरत्या उपायांमुळे प्रश्न सुटणार नाही, असेही ते म्हणाले.
ईडीचे कोर्टात दोन दावे
1. २७ डिसेंबरला मिशेलने घेतले चौकशीत मिसेस गांधींचे नाव
ईडीने कोर्टात सांगितले की, २७ डिसेंबरला चौकशीदरम्यान दलाल मिशेल याने मिसेस गांधींच्या नावाचा उल्लेख केला. तसेच, वैद्यकीय तपासणी सुरू असताना मिशेलने आपल्या वकिलाच्या हाती एक चुरगाळलेला कागद सोपवला. वकिलानेही तो मोबाइलखाली लपवून हळूच खिशात घातला. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून हे सुटले नाही. याची चौकशी केल्यावर लक्षात आले की, मिसेस गांधींशी संबंधित मुद्दा चिठ्ठीवर होता. पुरावे लपवणे किंवा नष्ट करण्याचा हा कट असल्याचा दावा ईडीने केला आणि चौकशीतून हे बाहेर येऊ शकते, असे न्यायालयात सांगितले.
2.इटलीच्या महिलेचा पुत्र होईल भारतात यानंतरचा पंतप्रधान
ईडीचे वकील एल. डी. सिंह यांनी कोर्टात सांगितले, मिशेल याने ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, इटलीच्या महिलेचा पुत्र 'आर' पुढील पंतप्रधान होत आहे.' या सांकेतिक भाषेची उकल होण्याची गरज आहे.
News about 'Helicopter scam'

Post a Comment

 
Top