0
यावल- शहरातील कुंभार टेकडीजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीप्रकरणी यावल पोलिसांनी पुन्हा एका संशयीतास अटक केली आहे. शेख शोहेब शेख हारून (रा. बाहेरपुरा, यावल) असे त्याचे नाव आहे. या अटकेच्या कारवाईनंतर घरफोडी प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी 27 नोव्हेंबरला तीन संशयीतांना अटक केली होती. त्याच दिवशी शोहेबचे नाव संशयीत म्हणून समोर आले होते मात्र, 27 नोव्हेंबरला त्याचा विवाह होणार होता. पोलिसांनी शोहेबच्या अटकेची तयारीही केली होती. परंतु अटकेपूर्वी त्याच्याविरोधात सबळ आवश्यक असल्याने पोलिसांना तीन दिवस थांबावे लागले. दुसरीकडे मात्र घरफोडीच्या गुन्ह्यात नाव आल्याने शोहेबचा विवाह वधुपित्याने ऐनवेळी मोडला.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील शासकिय विश्रामगृहाजवळ कुंभार टेकडी आहे. या ठिकाणी कुंभार समाज बांधव वास्तव्य करतात. दिवसा हे बांधव विटा थापण्यास घराला कुलूप लावून जाता. 14 नोव्हेंबरला दिवसा या वस्तीत भगवान वसंत कुंभार यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 11 हजार 145 रूपयांचे सोन्या, चांदीचे दागिन्यांसह 10 हजार रुपयांची रोकड लांबवली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी यावल पोलिसांनी तपासचक्र फिरवले असता चोरटे शहरातीलच असताचा अंदाज बांधण्यात आला. शहरात भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली. त्यातून एकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. सदरील घरफोडी ही अलताफ खान रशीद खान (वय-25, रा.बाबुजीपुरा, यावल), मोमीन नदीम शेख ताहेर (वय-19, रा.डांगपूरा, यावल) व तौसिफ खान महेमुद खान (वय-22) यांनी केल्याचे समोर आले. या घरफोडीत चोपडा रस्त्यावरील शेख शोहेब शेख हारून हा देखील असल्याचे पोलिसांना समजले होते. 26 नोव्हेंबरला रात्री पोलिस बाहेरपुऱ्यात जाऊन चौकशी केली असता शोहेब याचा 27 नोव्हेंबरला विवाह असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. शोहेबविरुद्ध ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार गोरख पाटील करीत आहे.

..आणि मोडले लग्न !
या घरफोडीत शेख शोहेब यांच्यावर पोलिसांचा दाट संशय होता व ते त्याच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला त्याच्याकडे आले होते. ही बाब वधुकडील मंडळींना समजली. वधुपित्याने ऐनवेळी लग्न मोडले. नियोजित वधुचे गावातीलच तरूणासोबत विवाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा गुन्ह्यात सहभाग या शोहेबला चांगलाच भोवला. मधुचंद्राचे स्वप्न पाहाणार्‍या शोहेबच्या नशिबी थेट पोलिस कोठडी आली.
Groom Arrested By Yawal Police in Robbery Case

Post a Comment

 
Top