सुनामीतील मृतांची संख्या ४२९, भूकंपाच्या धक्क्यानंतर दहशतीखाली पळापळ
सुमुर- इंडोनेशियातील दोन बेटांना ज्वालामुखी व सुनामीचा तडाखा बसल्यानंतर हजारो लोक बेघर झाले असून ते निर्वासितांच्या छावणीत राहत आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत मृतांची संख्या ४२९ वर पोहोचली आहे. सुमारे १४५६ लोक जखमी आहेत. किमान १२८ लोक बेपत्ता असल्याचे सांगितले.
नैसर्गिक संकटानंतर बेटावर अनेक ठिकाणी पडझड झालेल्या इमारती व घरांचे ढिगारे पडले आहेत. या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारी सैनिक व स्वयंसेवक युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. अनेक मुले तापाने फणफणले आहेत, असे डॉ. रिझाल अलिमीन यांनी सांगितले. आैषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे.
उपासमारीची समस्या आहे. इंडाेनेशियाला बसलेला हा सहा महिन्यातील तिसरा तडाखा आहे. लॉम्बॉक बेटाला जुलै व ऑगस्टमध्ये बसलेल्या तडाख्यानंतर २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियाच्या नैसर्गिक संकटानंतर दोन दिवसांत पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक आजार वाढू शकतात. संसर्गजन्य आजारांची भीती अाहे. या समस्या सुटल्या नाही तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Post a Comment