0
नाशिकरोड प्रभाग बैठकीत अधिकारी धारेवर; आरोग्य, रस्त्यावरील खड्डे, धूरफवारणी, बंद पथदीप या प्रश्नांवर चर्चा
नाशिक- शहरातील वाढते अतिक्रमण, आरोग्य, रस्त्यावरील खड्डे, धूरफवारणी, बंद पथदीप आदी प्रश्नांवर नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक चांगलीच गाजली. नगरसेवकांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

नगरसेवकांची अपूर्ण संख्या व सभागृहातील खंडित वीजपुरवठा यामुळे गेल्या आठवड्यात ही बैठक तहकूब करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुन्हा दुर्गा उद्यान येथील विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती पंडित आवारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग समितीची बैठक झाली. या बैठकीत नागरी समस्यांप्रश्नी अनेक नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी बिटको रुग्णालय परिसर, डॉ. आंबेडकर चौक, देवळालीगावातील आठवडे बाजार, मुक्तिधाम परिसर, सोमाणी उद्यान आदी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याने वाहनचालकांना अडथळा होतो. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. ही अतिक्रमणे केव्हा काढणार, असा सवाल केला. परंतु अतिक्रमण विभागाचे अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. यावर विभागीय अधिकारी म्हणाले की, पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल.

परिसरात अनेक पथदीप बंद असून ठिकठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. बंद पथदीप त्वरित सुरू करण्याची मागणी नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांनी केली. विहितगाव व शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी नगरसेविका सुनीता कोठुळे, सुनील गोडसे यांनी केली.

दसक भागात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी नगरसेविका मीरा हांडगे व शरद मोरे यांनी केली. शहरात धूरफवारणी होत नसल्याने डासांचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. संपूर्ण प्रभागात धूर केला जात नसल्याचा आरोप नगरसेवक लवटे व कोठुळे यांनी केल्यानंतर एका प्रभागात दोन दिवसांत पूर्ण फवारणी केली जाते यावर लवटे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


बैठकीस नगसेवक सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, शरद मोरे, मीरा हांडगे, सुनीता कोठुळे, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, डॉ. सीमा ताजणे, सुनील गोडसे, अंबादास पगारे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.News about Nashik Division meeting

Post a Comment

 
Top