0
जळगावच्या विदगावची घटना, आईवडील गंभीर

जळगाव - धावत्या दुचाकीचे शॉकअप अचानक तुटल्याने दुचाकीस्वार कुटुंबीय रस्त्यावर आदळले. यात पुढे बसलेला ५ वर्षीय बालक कपाळावर आदळल्याने जागेवरच ठार झाला, तर त्याचे आईवडील गंभीर जखमी झाले. बुधवारी दुपारी ११ वाजता जळगाव जिल्ह्यातील विदगाव पुलाजवळ हा अपघात झाला.

यज्ञेश राजेंद्र धनगर असे मृत बालकाचे नाव असून तो धनगर दांपत्याचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील राजेंद्र जगन धनगर (३०, कुसुंबा, ता. जळगाव) आणि आई माधुरी (२६) हे गंभीर जखमी झाले आहेत. राजेंद्र हे चारचाकी, ट्रक दुरुस्तीचे काम करतात. कामाच्या निमित्ताने ते कुसुंबा येथे भाड्याने घर घेऊन वास्तव्यास आहेत. बुधवारी सकाळी ते धार्मिक कामासाठी पत्नी, मुलासह दुचाकीने चिंचोली येथे जाण्यासाठी निघाले होते. विदगाव पुलापासून काही अंतर जाताच त्यांच्या धावत्या दुचाकीचे दोन्ही बाजूंचे शॉकअप अचानक तुटले. यामुळे पुढचे चाक निखळल्याने राजेंद्र धनगर यांच्या हातात दुचाकीचे हँडल राहिले. या घटनेमुळे दुचाकीवर बसलेल्या तिघांचा ताेल गेला. पुढच्या बाजूला बसलेला यज्ञेश हा रस्त्यावर आदळला. त्याच्या कपाळावर गंभीर दुखापत होऊन जागेवरच त्याचा मृत्यू झाला, तर राजेंद्र व माधुरी हे दांपत्यही रस्त्यावर अादळल्यामुळे त्यांच्याही डोक्यास गंभीर दुखापत झाली. या अपघातामुळे रस्त्यावरील इतर वाहनचालक, परिसरातील लोकांनी घटनास्थळावर गर्दी केली. सुमारे अर्ध्या तासानंतर तिघांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच यज्ञेशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली होती.

उपचार अपूर्ण सोडून दांपत्य अंत्यसंस्कारासाठी रवाना 
अपघातात धनगर दांपत्यास गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांना त्यांच्यावर उपचार करायचे होते, परंतु एकुलता मुलगा गेल्याने त्यांचे अवसान गळाले. त्यामुळे जखमी अवस्थेत उपचार न घेताच धनगर दांपत्य चिंचोली येथे यज्ञेशच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले.child death in two wheeler accident

Post a comment

 
Top