माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरात जेरबंद
माजलगाव- अनैतिक संबंधात अडसर येणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने रुमालाने गळा दाबून खून करणाऱ्या कावेरी बालासाहेब शिंदे या महिलेला आठ दिवसांनंतर माजलगाव पोलिसांनी पकडले. काही दिवसांत ती आपल्या माहेरी शेतात लपून बसली होती. पोलिस माहेरी येत असल्याचे कळाल्यानंतर ती आपल्या बहिणीकडे जात असतानाच पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता तिला माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरात जेरबंद केले. तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
माजलगाव तालुक्यातील शहाजानपूर येथील कावेरी बालासाहेब शिंदे हिने तिचा प्रियकर विठ्ठल आगे याच्या मदतीने रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी गेलेला पती बालासाहेबचा रूमालाने गळा दाबून खून केला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पतीचा मृतदेह शेतातील कुंपणावर फेकून कुंपणात वीज प्रवाह सोडून त्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी खोलवर तपास करून बालासाहेबच्या गळ्यातील रूमालाला लागलेले गवत, अंगावरील जखमा आणि मुठी आवळलेल्या अवस्थेतील मृतदेह या तीन कारणांवरून त्याचा खून झाल्याचे सिद्ध केले. खुनाचा प्रकार समोर येताच कावेरी शिंदे फरार झाली. तर प्रियकर विठ्ठल याला त्याच्या गावातूनच अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे यांनी शुक्रवारी सापळा रचून शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय परिसरात कावेरी शिंदे हिला अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी कावेरीला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश बी. व्ही.बुरांडे यांनी २४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहरात आल्याचे कळताच रचला सापळा
पतीचा खून केल्यानंतर पळून गेलेली कावेरी गोळेगाव येथे नातेवाइकाकडे गेली होती .पुढे ती पुन्हा जायकोची वाडी येथे माहेरी एका शेतात लपून बसली होती. शुक्रवारी ती सकाळी माजलगावकडे येत असल्याचे पोलिसांना कळाल्यानंतर ती अलगद सापडली. कावेरीला तिला चार मुलं असून दोन मुलं तिच्या माहेरी तर दोन मुलं सासरी आहेत.
पतीचा खून करून झाली होती पसार
कावेरी शिंदे ही मागील आठ दिवसांपासून फरार होती . ती बहिणीकडे जात असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे यांना कळताच पोलिस कॉन्स्टेबल सोजारबाई चव्हाण व काही पोलिस तेथे गेले. शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयाजवळ तिला ताब्यात घेतले.

Post a Comment