सप्तपदी व सौभाग्य मंगल कार्यालयांमध्ये बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास या घटना घडल्या.
औरंगाबाद- सिडको परिसरातील दोन मंगल कार्यालयांतील विवाह सोहळ्यांत एका व्यक्तीचे पैशांचे पाकीट, तर दुसऱ्या ठिकाणी एका महिलेची पर्स चोरून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. सप्तपदी व सौभाग्य मंगल कार्यालयांमध्ये बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास या घटना घडल्या.
दरम्यान, लग्न समारंभात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे मंगल कार्यालये व लॉनमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले.
अाठवडाभरात विवाह सोहळ्यातून दागिने, पैसे लांबवण्याच्या पाच घटना घडल्या आहेत. रविवारी बीड बायपासवरील एका लग्नात वधूच्या आईच्या पर्समधून दागिने पळवले होते. त्यापाठोपाठ बुधवारी सिडको परिसरात दोन घटना घडल्या. रफिउद्दीन मयोद्दीन खाटी (३८) हे एका लग्नसमारंभासाठी सप्तपदी मंगल कार्यालयात गेले होते. दुपारी दीड वाजता मंगल अष्टगंधाच्या कार्यक्रमात मग्न असताना चाेराने रफिउद्दीन यांच्या पँटच्या मागील खिशातील पाकीट चोरले. त्यात चार हजार रुपये रोख रक्कम होती. हा प्रकार समोर आल्यानंतर सिडको पेालिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. दुसरी घटना याच परिसरात असलेल्या सौभाग्य मंगल कार्यालयात सव्वादोन वाजेच्या सुमारास घडली. ३० वर्षीय महिला तिच्या भाच्याच्या लग्नात हजर होती. या दरम्यान लग्नविधीमध्ये व्यग्र असताना चोराने त्यांची पर्स चोरून नेली.
कार्यालयाच्या आवारातच त्यातील ऐवज यात सोन्याचे कानातले व ४ हजार रुपये रोख रक्कम काढून घेत तेथेच पर्स फेकून दिली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार एक अल्पवयीन मुलगा करत असल्याचेदेखील कैद झाले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment