नगर महापालिकेत राष्ट्रवादीची सोची समझी साजिश?
- नगर- महापौरपदाच्या निवडणुकीत राजकीय रणकंदन झाल्यानंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे! राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपने महानगरपालिकेतील सत्ता हस्तगत केल्यानंतर, ही भाजपची चाणक्य नीती आहे की राष्ट्रवादीचा धूर्तपणा? यावर विचारमंथन होऊ घातले आहे. राष्ट्रवादीचे आ. अरुण जगताप आणि संग्राम जगताप यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न विचारता परस्पर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्याचे उघड झाल्यानंतर जगताप पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करतील का? त्यांच्यासह १८ नगरसेवकांविरुद्ध पक्ष हकालपट्टीची कारवाई करेल काय आणि अशी कारवाई झालीच तर राष्ट्रवादीचा हा सर्व गट भाजपमध्ये विलीन होणार काय? आणि असा प्रवेश झालाच तर तो भाजपला भविष्यातील राजकारणासाठी परवडणारा आहे काय? यावर सध्या नगरमध्ये राजकीय तज्ज्ञांची माथेफोड सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक आणि १ अपक्ष अशा १९ नगरसेवकांच्या गटाने भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौर मालन ढोणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारात न घेता स्थानिक पातळीवर घेण्यात आलेला आहे, असं कुणी कितीही छातीठोकपणे सांगत असलं तरीदेखील प्रत्यक्षात मात्र हा संपूर्ण निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते आणि जगताप पिता-पुत्र, शिवाजी कर्डिले यांनी मिळूनच घेतलेला आहे, हे आता हळूहळू उघड होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे जगताप पिता-पुत्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करण्याची कुठलीही शक्यता तूर्तास तरी दिसत नाही.मुळातच विधानसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार या नात्याने संग्राम जगताप यांचा झालेला विजय तसा अनपेक्षितच म्हणावा लागेल. कारण नगर शहर पंचवीस वर्षांपासून शिवसेना- भाजप युतीच्या बाजूने कौल देणारे शहर म्हणून राज्यामध्ये ओळखलं जातं. जवळपास पंधरा वर्षं अनिल राठोड यांनी नगर शहरातून विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. भाजप-शिवसेना युती म्हणजे एक अटूट जोड है, जो कभी टूटता नही!' असं म्हणण्याची तेव्हा प्रथा होती. भविष्यातील राजकारणावर नजर ठेवून जगताप यांनी आपल्या गटातील नगरसेवकांबरोबर विचारविनिमय करून फक्त आणि फक्त विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अर्थात एवढी मोठी राजकीय खेळी करत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि तत्सम नेतेमंडळी यापासून अनभिज्ञ असतील, असं म्हणणंच मुळात हास्यास्पद ठरू शकते! त्यामुळे भाजपला पाठिंबा देण्याचा हा निर्णय ही राष्ट्रवादीची सोची समझी साजिश है..!'असे म्हणण्यास नक्कीच वाव आहे. आता पक्षाला डावलून निर्णय घेतला म्हणून नगरसेवकांना खुलासा करण्यासाठी पत्र पाठवणं, त्यांचा लेखी खुलासा मागून घेणं ही सर्व प्रक्रिया आहे. याची उत्तरं एकाच छापाची दिली जातील आणि या संदर्भातली प्रमुख भूमिका अरुण जगताप आणि संग्राम जगताप हे दोघे मिळून पक्षश्रेष्ठींना पटवून दिल्याचे दाखवतील आणि या विषयावर शेवटी असाच पडदा टाकला जाईल, अशी चिन्हे आहेत. संग्राम जगताप यांना भाजपमध्ये सध्या तरी आमदार म्हणून शहरातून विशेष काही करिअर करता येईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. कारण भाजपने जर असा निर्णय घेतला तर जो उरलासुरला पक्षाचा मतदार आहे तोदेखील दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असा धोका वरिष्ठ भाजप पदाधिकारी पत्करणार नाहीत. आणि जगतापदेखील असा निर्णय घेण्याचे धाडस दाखवणार नाहीत. त्यामुळे जगताप यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा निष्फळ असल्याचे लक्षात येईल.राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन महापालिकेतील सत्ता हस्तगत करणे यामध्ये भाजपची कोणतीही चाणक्य नीती' दिसून येत नाही. हा अगदी सरळ सरळ झालेला राजकारणातला खेळ आहे. आणि या खेळाचे सूत्रधार आहेत आ. शिवाजी कर्डिले. राजकारणात सगळं काही गमावलेल्या भाजपला थेट महापौर आणि उपमहापौर पदं मिळत असतील तर त्यासारखी मोठी राजकीय तडजोड दुसरी असू शकत नाही. शिवाय महापौर जरी भाजपचे असले तरीदेखील त्यांच्यावर नियंत्रण मात्र जगताप पितापुत्रांचेच राहणार आहे. पर्यायाने राष्ट्रवादीचेच हे नियंत्रण असेल. आता शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला आहे, असे जरी सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या महानगरपालिकेमध्ये 'आभासी सत्ताधारी' म्हणूनच काम करणार हे आज संग्राम जगताप यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झालेले आहे.'केमिकल लोचा' हा पुन्हा आमदार होण्याच्या उद्देशाने
'केमिकल लोचा' हा पुन्हा आमदार होण्याच्या उद्देशाने आ. संग्राम जगताप यांनी ठरवून तयार केलेला आहे. त्यात शिवाजी कर्डिले, अरुण जगताप यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा मसाला टाकलेला आहे. आणि या केमिकल लोच्यात भाजपची मात्र नुसतीच तडतड झालेली आहे. पुन्यांदा आमदार व्हायचंय नं मला.. होऊ द्या ना वं..!'असं साकडं नगरकरांना घालणाऱ्या संग्राम जगताप यांचं स्वप्न या निवडणुकीत पूर्ण होतं की नाही? हेच आता पाहायचं आहे.
Post a Comment