0
मराठा समाज बांधवांसाठी 16 टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाला आहे. 1 डिसेंबरपासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून आता त्याचा लाभ घेण्यासाठी मराठ्यांना जात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्या द‍ृष्टीने मराठा समाजातील मुला-मुलींनी जात प्रमाणपत्र काढायची तयारी सुरू केली आहे. मात्र, हे प्रमाणपत्र काढायचे कसे? याबाबत संभ्रमावस्था आहे. त्या अनुषंगाने याबाबतची प्रक्रिया मराठा बांधवांना समजून घ्यावी लागणार आहे. 

मराठा समाजाच्यावतीने आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून मोठा लढा उभारला होता. त्याला नुकतेच यश आले. राज्य शासनाने 16 टक्के आरक्षण कायदा मंजूर केला असून विधीमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक सर्वच पक्षांनी एकमताने मंजूर केले. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आता  हा कायदा लागू झाला आहे. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा बांधवांच्याकडे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे. हा दाखला मिळवण्यासाठी सहज, सोपी प्रक्रिया सांगण्यात आली असून त्यानुसार मराठा बांधवांना कार्यवाही करावी लागणार आहे.
जातीचा पुरावा काढा... 
सर्वप्रथम तुमच्या नावापुढे मराठा असा उल्लेख असणारा इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या कोणत्याही एका वर्गातील तुमचा शाळा सोडल्याचा दाखला काढा.पर्वीच काढलेला असेल तर त्यापैकी एकाची सत्यप्रत (र्ढीीश उेिू) घ्या.  जर तुम्हाला असा दाखला मिळाला नाही आणि तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर तिथुन बोनाफाईड सर्टिफिकेट काढा.परंतु बोनाफाईडवर तुमच्या जन्मतारीख व जातीचा उल्लेख असायला हवा. 
13 ऑक्टोबर 1967 चा जातीचा पुरावा -  
तुमच्या वडिलांचा 13 ऑक्टोबर 1967  रोजी किंवा त्यापूर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर मराठा अशी जात नमूद असलेला खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या. 
अ) पहिली ते बारावी पर्यंतचा शाळा सोडल्याचा दाखला (ओरीजनल किंवा डुप्लीकेट) किंवा आधीच काढला असेल तर अशा दाखल्याची सत्यप्रत शिल्लक असेल तर ती घ्या. 
ब) जन्म-मृत्यू नोंदीचा महसुल अभिलेखातील उतारा 
क) शासकीय-निमशासकीय नोकरीत असल्यास सेवापुस्तकाच्या पहिल्या पृष्ठाचा संबंधित कार्यालयाने जातीची नोंद साक्षांकित केलेला उतारा. 
ड) समाज कल्याण खात्याकडील जात पडताळणी समितीने वैध ठरविलेले जातीबाबत प्रमाणपत्र.  काही कारणाने वडिलांचा जातीचा दाखला उपलब्ध होत नसेल तर, तुमच्या घरात  13 ऑक्टोबर 1967  रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झालेले तुमचे भाऊ,बहीण,चुलते,आत्या,आजोबा किंवा इतर रक्त नाते संबंधातील व्यक्ती यापैकी कोणीही असेल तर त्याची मराठा अशी जात नमुद असणारा खालीलपैकी कोणताही एक पुरावा घ्या. 
रहिवासी व ओळखीचा पुरावा घेणे 
1) रेशनकार्ड
2)  आपले रेशनकार्ड घेऊन आपल्या भागातील तलाठी कार्यालयात जा.आपले रेशनकार्ड दाखवून तलाठ्याकडुन तुमच्या नावाचा रहिवासी दाखला घ्या.
3)  लाईट बिल किंवा कर आकारणी पावती ) 
4) मतदान ओळखपत्र/पॅन कार्ड/ड्रायविंग लाइसेंस/कॉलेज ओळ्खपत्र/आधारकार्ड अशा प्रकारे रहिवासी व ओळखीच्या पुराव्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे तयार ठेवा. 
रेशनकार्ड,  रहिवासी दाखला किंवा लाईट बिल,  कोणतेही एक ओळखपत्र या पुराव्यांच्या प्रत्येकी दोन सत्यप्रती (र्ढीीश उेिू) तयार करुन ठेवा.

Post a Comment

 
Top