0
विश्व विक्रम झाल्यानंतर तयार भरीत नागरिकांना विनामुल्य वाटप करण्यात येणार आहे.

जळगाव- शहरातील सागर पार्कवर खान्देशच्या वांग्यांचे भरीत करण्याचा विश्वविक्रम शुक्रवारी करण्यात येणार आहे. या विक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. भरीतासाठी लागणाऱ्या साहित्यांची माेजदाद करण्यात आली आहे. भरीत बनवणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनाेहर व विक्रमाची नाेंद घेणारे गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डचे नागपूर येथील प्रतिनिधी गाैरव द्विवेदी शहरात दाखल झाले आहेत.

मराठी प्रतिष्ठानच्या वतीने खान्देशच्या वांग्याच्या भरीताला जगभरात प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने या विश्वविक्रमी भरीत बनवण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ५ हजार किलाे साहित्य मावेल अशी ५५० किलाे वजनाची भव्य कढई व लाेखंडी चुल काेल्हापूर येथून बनवून आणण्यात आली आहे. प्रसिद्ध शेफ मनाेहर हे दाेन जणांच्या मदतीने हे भरीत तयार करणार आहेत. त्यासाठी सागरपार्कवर खास चुल उभारली आहे.

वस्तूंची माेजदाद
विश्वविक्रमी भरीतासाठी लागणाऱ्या वस्तूंची गॅझेटेड ऑफिसर्स यांच्या उपस्थितीत वजन माेजण्यात येणे आवश्यक असल्याने गृह शाखेतील तहसीलदार मिलिंद लाेखंडे यांच्या उपस्थितीत साहित्याची वजन माेजण्यात आले. यात भरीताचे वांगे ३ हजार ९०० किलाे, मिरच्या ३०० किलाे, लसूण १२० किलाे, काेथिंबीर १०० किलाे, तेल १५० किलाे, जिरे १० किलाे, मीठ २० किलाे यांचा समावेश हाेता.


विनामूल्य भरीत वाटपासाठी २० स्टाॅल
विश्व विक्रम झाल्यानंतर तयार भरीत नागरिकांना विनामुल्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी २० स्टाॅल लावण्यात येणार आहेत. त्यात महिला व पुरुष यांच्या स्वंतत्र व्यवस्था असणार आहे. या कामासाठी ४० स्वंयसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

पाच किलाेचे ट्रायल
वांग्यांना भाजल्यानंतर त्याचे साल व देठाचे वजन कमी हाेते. त्यामुळे निव्वळ किती गर उरताे याची पडताळणी करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकार्डचे प्रतिनिधी द्विवेदी यांच्या उपस्थितीत ५ किलाे वांगे भाजण्यात आले. या वेळी ५किलाे वांगे भाजल्यानंतर ३ किलाे ५०० ग्राम एवढा गर निघाला. शुक्रवारी भल्या पहाटे वांगे भाजण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारीच कापसाच्या परकाठ्याचे दहा बेड लावून त्यावर वांगे ठेऊन पुन्हा परकाठ्या ठेवल्या आहेत.
News World record in Jalgoan

Post a Comment

 
Top