0
अद्याप परवानगीच घेतली नाही

  • मुंबई - अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगप्रसिद्ध स्मारक आराखड्यास अग्निशमन दलाची परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यासंदर्भात मुंबई अग्निशमन दलाने प्रकल्पाचे अध्यक्ष व शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांना पत्र लिहिले असून प्रकल्पाचे आराखडे तत्काळ सादर करण्यास बजावले आहे.
    अरबी समुद्रातील एका खडकावर शिवरायांचा जगातील सर्वात उंच १२३.३ मीटर पुतळा उभारण्यात येत आहे. पुतळा ज्या चबुतऱ्यावर उभा असेल, ते पेडस्टल ८१.८० मीटर उंच असून त्यात १६ मजली इमारत असणार आहे. येथे एक हेलिपॅड असून इलेक्ट्रिक रिसीव्हिंग स्टेशन आणि इलेक्ट्रिक सबस्टेशनही असणार आहे. तसेच येथे १० खाटांचे रुग्णालय, व्ह्यूइंग गॅलरी, सभागृह, प्रदर्शन हाॅल आदी पायाभूत सुविधाही उभारण्यात येणार आहेत. धक्कादायक म्हणजे स्मारकाचे काम सुरू झाले असताना, प्रकल्प इमारतीचे आराखडे तयार असतानाही ते अग्निशमन दलास दाखवलेले नाहीत. अग्निशमन दलाकडून ना हरकत घेतली नसल्याची बाब सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रकल्पाच्या सादरीकरणादरम्यान उघडकीस आली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुखाने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी देखरेख व समन्वय समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांना आॅक्टोबर महिन्यात पत्र लिहून आराखडे सादर करण्यास बजावले आहे.
    अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारक प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारकडून विविध १२ परवानग्या घेण्यात आल्या आहेत. मात्र दैनंदिन १० ते १५ हजार पर्यटक भेट देणार असलेल्या या प्रकल्पस्थळी आग लागल्यास काय प्रतिबंधक यंत्रणा असणार, याची मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नसल्याबाबत आश्चर्य मोठे व्यक्त करण्यात येत असून सुधारणेची मागणी होत आहे.
    प्रकल्पाचे बांधकाम एलअँडटी करत आहे. इजिज इंडिया प्रकल्प सल्लागार कंपनी (पीएमसी) आहे. तर प्रकल्पाची मालकी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) असल्याने अग्निशमन दलाची परवानगी न घेण्यास पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा ढिसाळपणा कारणीभूत ठरला आहे. शिवस्मारक प्रकल्पाला दैनंदिन १५ हजार पर्यटक भेट देण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सल्लागार कंपनीने प्रकल्पाची 'ट्रॅफिक स्टडी' करण्याचे मूळ नियोजन होते. मात्र असा अभ्यास अद्याप झाला नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे पहायला मिळत आहे.
    कायमस्वरूपी यंत्रणा हवी, खर्च ३६०० कोटींवर 
    शिवस्मारक समुद्रात २०० नाॅटिकल मैलांवर आहे. आग लागल्यास मुंबई अग्निशमन दल कसे पोहोचणार, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रकल्पात कायमस्वरूपी अग्निशमन दल उभारावे लागणार असून त्यामुळे प्रकल्पाचा खर्च ३६०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.News about Shiv Smarak security

Post a Comment

 
Top