0
फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानातील मुलीच्या प्रेमात पडलेला हमीद तिला भेटण्यासाठी पाकिस्तानात दाखल होता.

मुंबई- 'यापुढे फेसबुकवरून कोणाच्याही प्रेमात पडणार नाही' हे शब्द आहेत पाकिस्तानातील तुरुंगात सहा वर्षे काढल्यानंतर मायदेशी परतलेल्या हमीद निहाल अन्सारीचे. दोन दिवसांपूर्वी वाघा-अटारी सीमारेषेवरून भारतात प्रवेश केलेला हमीद गुरुवारी सकाळी मुंबईतील वर्सोवा येथील आपल्या घरी परतला.

पाकिस्तानातून सुटलेला हमीद पोहोचला घरी

सकाळी साडेनऊच्या सुमारास आपले आईवडील आणि भावासह हमीद अन्सारीचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर थेट त्याने वर्सोवा येथील सातबंगला परिसरातील तुलसी इमारतीतील चौथ्या मजल्यावरील आपले घर गाठले. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी अन्सारी परिवाराच्या दरवाजाबाहेर लावलेल्या ' वेलकम हमीद' अशा फलकाकडे पाहून हमीदसह अन्सारी कुटुंबीय भारावून गेले. सर्वांच्या स्वागताचा स्वीकार केल्यानंतर हमीद आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काही वेळ माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. माझ्यासोबत गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांबाबत बोलण्याची माझी फारशी इच्छा नाही. मात्र, या संपूर्ण कालावधीत मला भारत सरकार आणि इतरही अनेकांकडून मिळालेल्या पाठबळाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया हमीदने या वेळी व्यक्त केली. कोणतीही बाब आपल्या आईवडिलांपासून लपवू नये हा मोठा धडा या सर्व अनुभवातून शिकल्याचेही त्याने कबूल केले. भविष्यातील वाटचालींबद्दल विचारले असता हमीद म्हणाला की, सगळा अंधार आता संपला असून भविष्याबाबत मला आता विचार करावा लागणार आहे. लवकरच आता मी चांगल्या नोकरीसाठी प्रयत्न करणार असून त्यानंतर लग्नाचाही विचार करणार असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, हमीदच्या शेजारी आणि परिसरातील नागरिकांची त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यानेही कुणालाही नाराज केले नाही.

अफगाणिस्तानमार्गे पोहाेचला पाकिस्तानात
फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानातील एका मुलीच्या प्रेमात पडलेला हमीद तिला भेटण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात दाखल झाला होता. त्यानंतर पेशावरमधील एका हॉटेलात थांबलेल्या हमीदला पाकिस्तान पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तीन वर्षे मात्र हमीद अन्सारीच्या अटकेबाबत पाकिस्तानकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नव्हती. अखेर डिसेंबर २०१५ मध्ये पाकिस्तान सरकारने हमीद अन्सारी नावाचा तरुण आमच्या ताब्यात असल्याचे मान्य केले. मात्र, बनावट पासपोर्टच्या आधारे पाकिस्तानात प्रवेश करून बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही शिक्षा नुकतीच संपल्याने त्याच्या भारतातील परतीचा मार्ग मोकळा झाला होता. हमीदच्या सुटकेसाठी परराष्ट्र खात्यातर्फे प्रयत्न करण्यात आले होते. या प्रयत्नांना यश येत अखेर मंगळवारी हमीद वाघा परिसरातील सीमा ओलांडून भारतात पोहोचला. हमीद याने देशात परतल्यानंतर केंद्र सरकार पोलिस आणि सर्व मदत करणाऱ्यांचे जाहीर आभार मानले.
Not again will love on Facebook: Hameed

Post a Comment

 
Top